- अनिरुद्ध पाटील । लोकमत न्यूज नेटवर्कबोर्डी : शासनाच्या शिक्षण विभागाकडून जिल्हा परिषद शाळेतील पहिली ते ८ वीच्या विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या गणवेशासाठीचा निधी प्राप्त न झाल्याने डहाणू तालुक्यातील सुमारे ४७ हजार विद्यार्थी त्यापासून वंचित राहणार आहे. १५ जून हा शाळा प्रवेशाचा दिवस असल्याने विद्यार्थी व पालकांमध्ये संभ्रमाचे वातावरण असून या सर्वांची समजूत काढताना शिक्षकांच्या नाकीनऊ येणार आहेत. सर्व शिक्षा अभियानाअंतर्गत जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यर्ा्थ्याना गणवेशाचे वाटप करण्यात येते. या वर्षांपासून दोन गणवेशाची रक्कम ४०० रुपये विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार असून या करिता विद्यार्थी व पालकांचे संयुक्त बँक खाते उघडण्याचे प्रयत्न सुरु आहेत. संबंधित केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक व शिक्षकांनी विद्यार्थी-पालकांना या बाबतची माहिती दिली होती. त्यानंतर डहाणू या आदिवासी तालुक्यातील ग्रामीण भागात राष्ट्रीयकृत बँकांची वानवा असताना पालकांनी पायपीट करून गावालगतच्या बँकांमध्ये खाते काढून घेतले. १० वर्षाखालील विद्यार्थ्यांकरिता संयुक्त खाते काढण्यासाठी आधारकार्ड व फोटो आणि किमान पाचशे रु पये जमा रक्क्म खात्यात भरणे बंधनकारक आहे. तर १० वर्षावरील विद्यार्थ्यांचे स्वत:चे खाते काढून किमान शंभर रुपये जमा करणे आवश्यक आहे. मात्र शासनाकडून गणवेशाचा निधी उपलब्ध झाला नसल्याने लाभार्थ्यांना गणवेशापासून वंचित रहावे लागले आहे. त्याचा परिणाम पालकांवर झाला असून ऐन पेरणीच्या हंगामात त्यांना तत्काळ पदरमोड करून गणवेशासाठी पैसे उभे करावे लागणार आहेत. शिवाय अचानक ग्राहकांची संख्या वाढणार असून कमी कलावधीत मालाचा पुरवठा करावा लागणार असल्याने शिप्यांना जास्त वेळ काम करावे लागणार आहे. डहाणू पंचायत समितीच्या शिक्षण विभागाअंतर्गत जिल्हा परिषदेच्या ४६९ शाळा असून त्या पैकी १ ली ते ८ वी इयत्तेतील २५,०४८ मुली व २२,६१० मुले असे एकूण ४७,६५८ लाभार्थी विद्यार्थी आहेत. या योजनेकरीता अनुसूचीत जाती व जमाती आणि दारिद्र्यरेषेखालील पालकांची मुले तसेच आठवी पर्यंतच्या सर्व मुली पात्र असल्याची माहिती डहाणूचे गट शिक्षणाधिकारी अनिल सोनार यांनी दिली. गणवेशाचा निधी प्राप्त झालेला नाही. सदर योजनेचे तालुक्यात २५,०४८ मुली तर २२६१० मुले असे एकूण ४७,६५८ विद्यार्थी आहेत.-अनिल सोनार, गटशिक्षणाधिकारी, डहाणू
गणवेश अनुदानापासून डहाणूतील विद्यार्थी वंचित
By admin | Published: June 15, 2017 2:29 AM