डहाणू : येथील नगरपरिषदेच्या निवडणूकीचे बिगुल वाजले असून १८ नोव्हेंबर रोजी उमेदवारी अर्जाचे वितरण व अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. तर १३ डिसेंबरला प्रत्यक्ष मतदान होणार असून १४ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. या संदर्भामध्ये गुरुवारी सहाय्यक जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्या अध्यक्षते खाली प्रांत कार्यालयामध्ये सर्वपक्षिय बैठक पार पडली.२०११ च्या जनगणनेनुसार ५०, २८६ लोकसंख्या असलेल्या डहाणू नगरपरिषदेत १२ प्रभागांची रचना करण्यात आली असून ३३ हजार ८२६ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. या द्वारे २५ नगरसेवक व नगराध्यक्ष थेट जनतेतून निवडले जाणार आहेत. १८ नोव्हेंबरपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होऊन नामनिर्देशन पत्र स्विकारण्याचे ठिकाण सहा. जिल्हाधिकारी डहाणू यांचे कार्यालय असणार आहे. अर्जांची छाननी २५ नोव्हेंबर रोजी असून अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख ३० नोव्हेंबर रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत (अपिल नसेल तेथे) असणार असून उमेदवारांची यादी जाहीर करण्याची तारीख १ डिसेंबर आहे. मतमोजणी १४ डिसेंबर रोजी बी.एस.ई.एस. कम्युनिटी हॉल लोणीपाडा डहाणू येथे होणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहाय्यक जिल्हाधिकारी आंचल गोयल यांची नियुक्ती करण्यात आली आहे.दरम्यान, आगामी होणाºया डहाणू नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी येथील काँग्रेस आय, राष्टÑवादी काँग्रेस, भाजप, शिवसेना, बहुजन विकास आघाडी, माकपा, अपक्ष असे सर्वच राजकीय पक्ष निवडणूक रिंगणात उतरणार आहे. दरम्यान, सर्वच पक्षांनी इच्छुक उमेदवारांची मुलाखत घेऊन त्यांच्यावर शिक्कामोर्तब केले आहे.डहाणू नगरपरिषदेच्या निवडणूकीची येथील सर्वच राजकीय पक्षांची जोरदार तयारी सुरू असून आयाराम, गयाराम यांचे येणे जाणे सुरू झाले असल्याने येथील राजकीय घडामोडींना वेग आला आहे.
डहाणू नगर परिषदेची निवडणूक १३ डिसेंबरला, सर्व पक्षांकडून मोर्चेबांधणी सुरु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2017 1:30 AM