शौकत शेख,
डहाणू- साडेचार लाख लोकसंख्या असलेल्या डहाणू तालुक्यात गेल्या सहा महिन्यापासून स्टॅम्पपेपरचा तुटवडा जाणवत आहे. शिवाय तालुक्यातील लोकांसाठी डहाणूत केवळ तीनच स्टॅम्पपेपर परवानेधारक असून ते आपल्या सोयीनुसार येत-जात असल्याने हजारो विद्यार्थी, शेतकरी, नागरिकांचे प्रचंड हाल होत आहे.तालुक्यात एकूण ८५ ग्रामपंचायती असून सुमारे दिडशेपेक्षा अधिक गावे व खेडी आहेत. त्यात निम्म्यापेक्षा अधिक गावे मुंबई-अहमदाबाद महामार्गाच्या पलीकडच्या पूर्व भागात आहेत. दिवसी, चळणी, सूखड आंबा, दापचरी, दाभाडी, मोडगाव, निंबापूर, शेणसरी, धरमपूर, सायवन इत्यादी गावे डहाणूपासून ५० कि.मी. पेक्षा अधिक लांब आहेत. अतिदुर्गम, जंगलपट्टी व डोगराळ भागातील आदिवासीना जातीचे, उत्पन्नाचे दाखले, गॅस सिलिंडर, रेशनकार्ड, बँक, न्यायालये, जमीनीचा सातबारा, प्रतिज्ञापत्र, जमीनीची खरेदी विक्री तसेच शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी स्टॅम्पपेपरची आवश्यकता असते. त्यांना स्टॅम्पपेपर खरेदी करण्यासाठी दोनशे रूपयांचा खर्च करून डहाणूत यावे लागते. परंतु डहाणूत आल्यानंतर मुद्रांक विक्रेता हजर नसेल तर स्टॅम्पपेपर मिळत आणि कधी तो असला तर पेपर शिल्लक नाही असे ठराविक उत्तर दिले जात असल्याने शाळकरी विद्यार्थी व नागरिकांची कागदपत्रे तयार करण्यासाठी मोठी कुचंबणा होताना दिसत आहे. काही स्टॅम्पपेपर विक्रेत्याकडे स्टॅम्पपेपर असून ही ग्राहकाला देण्यासाठी टाळाटाळ केली जात असल्याची शेकडो नागरिकांची तक्रार आहे.>गावातही परवानाधारक मुद्रांकविक्रेते नेमा!डहाणू उपकोषागार कार्यालयाअंतर्गत केवळ तीन मुद्रांक विक्रेते परवानेधारक असून त्यात तातडीने वाढ केली जावी तसेच मुद्रांकांचा पुरवठाही वाढविला जावा, अशी नागरिकांची मागणी आहे. बोर्डी, झाई, घोलवड, चिंचणी, वानगाव, कासा, सूर्यानगर, सायवन इत्यादी महसूली गावांत परवानाधारक मुद्रांक विक्रेत्याची नियुक्ती करावी अशी मागणी आहे.