- अनिरुद्ध पाटीलबोर्डी : महाराष्ट्र गुजरात सीमेवरील पालघर जिल्ह्याच्या डहाणू तालुक्यात दिवाळीनिमित्त धनत्रयोदशी ते बलिप्रतिपदा या काळात घोर या नृत्योत्सवाची थोर परंपरा आहे. . येथील स्थानिक गुजराती भाषिक समाजात त्याला मानाचे स्थान असून त्यासाठी पर्यटकही दाखल होतात.तालुक्यातील किनारी भागात वसलेल्या माच्छी, भंडारी, बारी या गुजराती भाषिक समाजात दिवाळी सणानिमित्त हा नृत्योत्सव केला जातो. धनत्रयोदशीपासून नरकचतुर्दशी, लक्ष्मीपूजन आणि बलिप्रतिपदेपर्यंत समाजबांधवाच्या अंगणात, मंदिर आणि ग्रामदैवतांच्या ठिकाणी मंडली मातेला(सरस्वती देवी) प्रसन्न करण्यासाठी हा नाच केला जातो. घोर हे लोखंडी सळईच्या गोल रिंगणात घुंगरू गुंफून तयार केले जाते. ते हाताच्या मुठीत घेऊन लयबद्धरित्या वाजवून हा नाच केला जातो. तो पुरुषीप्रधान असून १२ ते १५ जोड्या त्याच्या तालावर दोन ते तीन प्रकारचा फेर धरून नाचतात. डोक्यावर फेटा, अंगात बनीयन तर छातीवर लुगड्यांच्या(नऊवारी) साह्याने नक्षीदार विणकाम केले जाते. त्यावर झेंडू फुलांच्या माळांची सजवट तर कमरेला घुंगरांची माळ बांधतात. पांढर्या धोतरामुळे व्यक्तिमत्व रुबाबदार दिसते. शिवाय डोळ्यात काजळ घातल्याने सौंदर्य खुलून दिसते. एका हातात दांडिया आणि दुसऱ्या हातात मोरपंखाचा गुच्छ घेतलेल्या नर्तकाला घोरया म्हणतात. त्यांना दैवतांप्रमाणे सवाशिणींकडून पुजले जाते. बगळी(बगळा) मंडली मातेचे वाहन कापडाने बनविले जाते. ते ८ ते १० फुट उंच बांबूच्या टोकावर बांधून मध्यभागी धरले जाते. कवया(गायक) हा पारंपरिक रामायण, महाभारत तसेच गणपती, राम-कृष्ण यांच्या पौराणिक कथांची आणि विविध ग्राम व कुलदैवतांची कवणं (गीतं) गातो. पारतंत्र्य काळात तसेच संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात त्याने शाहिराची भूमिका बजावल्याचा इतिहास आहे. दरवर्षीप्रमाणे हा पारंपरिक नृत्यप्रकार पाहण्यासाठी स्थांिनकांप्रमाणेच, पर्यटक आणि नृत्य अभ्यासकांची गर्दी जमते. चिखले, घोलवड, आगर आदी गावतील कवये प्रसिद्ध आहेत.सीमा भागातील माच्छी, भंडारी या गुजराती भाषिक समाजाचा हा पारंपरिक नृत्यप्रकार आहे. त्याद्वारे या समाजाचा सांस्कृतिक वारसा वृद्धिंगत होत आहे. त्याच्या संवर्धनासाठी तारपानृत्या प्रमाणेच शासन मान्यता मिळायला हवी.- मनीष जोंधळेकर (समाजधुराणी, माच्छी समाज चिखले, वडकतीपाडा)
डहाणू तालुक्यात घोर नृत्योत्सवाची गौरवी परंपरा, तारपानंतरचे आदिवासींचे घोर हे महत्वाचे वाद्य
By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2018 2:45 AM