डहाणू/बोर्डी : डहाणू तालुक्यातील समुद्रकिनाऱ्यालगत पाणथळ जमिनीवर मातीचा भराव घालून बेकायदेशीर बांधकाम करण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे. समुद्र अधिनियम कायदा पायदळी तुडवून नैसिर्गक जलयुक्त शिवारं बुजविली जात आहेत. कायद्याचे उल्लंघन करणारा हा प्रकार रोखणारी डहाणूतील प्रशासकीय यंत्रणा निष्प्रभ ठरल्याने आगामी काळात या गावांमध्ये पाणीटंचाई, शेती आणि पर्यावरण आदि. प्रश्न बिकट बनणार आहे. त्यामुळे ग्रामस्थ व पर्यावरण प्रेमींनी कारवाईची मागणी केली आहे. हॉटेल व्यवसाय आणि सेकंड होमच्या शहरी मानिसकतेमुळे समुद्रकिनाऱ्यालगत जमिनीला सोन्याचा भाव आला आहे. डहाणू तालुक्यातील नरपड, चिखले, घोलवड या समुद्रकिनारी गावातील आदिवासींना पैशाचे प्रलोभन दाखबून, त्यांच्याकडील शेत जमिनी खरेदी करून धनदांडग्यांना विकणाऱ्या दलालांच्या टोळ्या सक्रिय झाल्या आहेत. डहाणू बोर्डी या प्रमुख राज्य मार्गाच्याकडेला असलेल्या पाणथळ जमिनी उच्चतम भरती रेषेपासून अवघ्या १०० ते १५० मीटर अंतरावर आहेत. विशिष्ट भौगोलिक रचनेमुळे जून ते डिसेंबर या कलावधीत पावसाचे पाणी साठत असल्याने जलस्त्रोतांची पाणी पातळी वाढण्यासह, क्षारतेचे प्रमाण घटण्यास मदत होते. विविध पाणथळ वनस्पती व पक्षी, मासे, कीटक, फुलपाखरे इ. वास्तव्यामुळे परिसर जैव विविधतेने नटल्याने परिसंस्था बळकट बनली आहे. भात उत्पादनाकरीता हा भाग पोषक असल्याने स्थानिकांचे जीवनमान उंचावण्यास हातभार लागतो. लोकांचे दैनंदिन जीवन स्थानिक जैव संस्कृती मध्ये भिनलेले असते. त्यामुळे नैसिर्गक जलयुक्त शिवरांवर भात शेतीसह शेत तळ्याच्या माध्यमातून मत्स्यशेती, कोळंबी प्रकल्प आदींकरिता स्थंनिकांना प्रेरित करणे अपेक्षित आहे. दरम्यान दुष्काळावर मात करण्यासाठी जलस्त्रोतांचे बळकटीकरण करण्यास शासनाचा जलसंधारण आणि ग्रामविकास विभाग आग्रही आहे. (वार्ताहर)
डहाणूत पाणथळ जमिनीवर घातला भराव
By admin | Published: June 04, 2016 1:12 AM