- अनिरु द्ध पाटील, बोर्डीडहाणू तालुक्यात २५ व २६ डिसेंबर रोजी बीचफेस्टीव्हलचे आयोजन रोटरी क्लबने केले होते. पारनाका येथील समुद्रकिनारी क्लबच्या अध्यक्षा डॉ. मोनिका मुळीक यांच्या हस्ते उद्घाटन झाले. त्यानंतर फेस्टीव्हलला जल्लोषात प्रारंभ झाला. विशाल नांदलस्कर यांनी सायकल रॅलीचे उद्घाटन केले. ज्युनियर, सीनियर आणि ओपन अशा तीन गटात स्पर्धा घेण्यात आली. त्या मध्ये एकूण चारशे स्पर्धकांनी भाग घेतला होता. पारनाका येथील समुद्रकिनारी रोटरी क्लबचे बोधचिन्ह, डहाणू फोर्टची प्रतिकृती आणि मुलगी वाचवा यावर आधारित वाळूशिल्प साकारण्यात आले होते. चिखले गावच्या सुनील गोंधळेकर, दीपक डोंगरे या वाळूशिल्पकारांनी काढलेल्या हुबेहूब शिल्पाला पर्यटकांनी विशेष दाद दिली. गिनीज बुक रेकॉर्ड करणारे अशोकभाई शहा यांनी काईट शोच्या माध्यमातून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. रिमोट कंट्रोल प्लेन्स शोने गर्दी खेचली. या वेळी पारंपरिक आदिवासी नृत्याचे सादरीकरण आणि मुलांच्या विविध स्पर्धा घेण्यात आल्या. पन्नास पेक्षा अधिक खाद्य पदार्थांच्या स्टॉलद्वारे स्थानिक शाकाहारी व मांसाहारी अशा विविध पदार्थाची लज्जत पर्यटकांना चाखता आली. या वेळी रोटरी क्लबने वीस गरीब विद्यार्थ्यांना सायकलीचे वाटप केले. दोन दिवसात सुमारे सातहजार पर्यटकांनी फेस्टीव्हलमध्ये सहभाग घेतल्याचे आयोजकांनी सांगितले. डहाणू प्रांत अधिकारी, तहसीलदार, नगरपालिका, पोलीस, पर्यटक आणि डहाणूकरांनी यांनी विशेष योगदान दिले. स्थानिक उद्योगधंदे, कला व संस्कृती यांना व्यासपीठ देण्याचा महोत्सवाचा उद्देश सफल झाल्याची प्रतिक्रिया माजी रोटरी क्लब अध्यक्ष निमिन गोईल यांनी व्यक्त केली.
डहाणूत बीच फेस्टिव्हलची धूम
By admin | Published: December 27, 2016 2:22 AM