शौकत शेख, डहाणू डहाणूतील मिनी अंगणवाडी तसेच अंगणवाडीतील मुलांना बालविकास प्रकल्पाअंतर्गत हक्काच्या इमारती मिळालेल्याच नाहीत. त्यामुळे भाड्याच्या घरात, एखाद्या शाळेच्या ओट्यावर, मोडक्या-तोडक्या समाज मंदिरात, झोपडीत किंवा झाडाखाली बसून शिक्षणाचे धडे गिरवावे लागतात. अंगणवाड्यांची आजची अवस्था पाहून पालकांना चिंता करावी लागते.डहाणू तसेच कासा अंतर्गत येणाऱ्या मिनी अंगणवाडीच्या इमारतीसाठी शासनाकडून निधीच उपलब्ध होत नाही, शिवाय आदिवासी उपयोजना, जिल्हा नियोजन, मानव विकास योजना अंतर्गत देखील अंगणवाडीसाठी भरीव निधी मिळत नाही. त्यामुळे डहाणूतील हजारो चिमुरड्यांना धोकादायक इमारतीत तसेच जंगलपट्टी भागातील खाच खळग्यांची वाट तुडवत झोपडीत शिकण्याची वेळ आली आहे. विशेष म्हणजे डहाणू बाल विकास प्रकल्पाकडे १७५ हक्काच्या इमारती असल्या तरी त्यातील सुमारे २५ इमारती दुरुस्तीअभावी धोकादायक झाल्या आहेत. तरीही त्यांचा वापर सुरू आहे.अनेक वर्षापासून इमारतीच्या दुरुस्तीचा प्रस्ताव पाठविला जाते. परंतु निधीच्या कमतरतेमुळे अनेक इमारती ओस आहेत. तर दरवर्षी अंगणवाडी इमारतीचे बांधकाम (नवीन) प्रगती पथावर आहेत असे बालविकास प्रशासन सांगते. नवीन अंगणवाडी इमारती बांधकामाचे ठेके गावातील सरपंच, उपसरपंच, सदस्य, माजी सदस्य तसेच विविध पक्षाचे कार्यकर्ते घेत असल्याने आतापर्यंत चाळीस अंगणवाडी इमारतीचे बांधकाम अपूर्णावस्थेत आहेत. तर जागे अभावी व तांत्रिक अडचणीमुळे अंगणवाडीचे बांधकाम थांबले आहेत.
डहाणूत अंगणवाडी झोपडीमध्ये
By admin | Published: December 07, 2015 12:50 AM