- शौकत शेखडहाणू : हिरव्यागार निसर्ग सौंदर्याने नटलेल्या डहाणू बोर्डी, चिंचणीत या वर्षी देखील मुंबई, ठाणे, पुणे, तसेच गुजरात राज्यातील हजारो पर्यटक थर्टीफस्टच्या सेलीब्रेशनसाठी दाखल झाले असून होणार येथील हॉटेल्स, फार्म हाऊस, रिसोर्ट, ढाबे, उपहारगृहे तसेच शासकीय विश्रामगृहे हाऊसफुल्ल झाली आहे. ३१ डिसेंबरच्या दिवशी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, बेकायदा पार्ट्या होऊ नयेत यासाठी डहाणू, घोलवड, वाणगांव पोलीसांकडून सर्वत्र चोख बंदोबस्त ठेवण्यात येणार असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार धर्माधिकारी यांनी दिली.डहाणूला सुंदर असा समुद्र किनारा लाभलेला आहे. निसर्गाची तर बहुमूल्य अशी देणगीच डहाणूला लाभलेली आहे. पारनाका व बोर्डी येथील समुद्रकिनारे खूपच नयनरम्य असे आहेत. तर चिंचणी, वरोर, वाढवण येथील सुरुंच्या बागा तर सणासुदीच्या दिवसांत तसेच प्रत्येक रविवारी पर्यटकांनी फुलून जात असतात. येथील विशाल समुद्र किनाऱ्यासमोरच चांगली हॉटेल्स उपलब्ध असल्याने पर्यटकांची राहण्याची व जेवणाची उत्तम सोय होते. त्यामुळे मुंबई, सुरत, वसई, ठाणे, पुणे येथील हजारो पर्यंटक ३१ डिसेंबर साजरा करण्यासाठी डहाणूला पसंती देत असतात. या वर्षी देखील बोर्डी, डहाणू बीच, चिंचणी, तारापूर, वाढवण, वरोर या पट्ट्यातील हॉटेल्स, रिसॉर्टस्चे मोठ्या प्रमाणात बुकींग झाले असल्याचे व्यावसायिकांनी सांगितले. डहाणू बीच वरील सर्वच हॉटेल्स हाऊसफुल्ल झाल्याची माहिती मिक्की ईराणी यांनी दिली. त्यामुळे वेळेवर येणाºया पर्यटकांना मोठमोठ्या चिकूच्या वाड्यांवर थर्टीफस्ट साजरा करावा लागेल.हजारो पर्यटक रविवारीच डहाणूत दाखल होणार असल्याने डहाणूस्टेशन, पारनाका, बोर्डी, घोलवड या गर्दीच्या ठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात यावा. पोलिसांप्रमाणेच स्वत: प्रभारी अधिकाºयांनीही त्या परिसरात फिरावे. तसेच गर्दीचा फायदा घेऊन साखळीचोरी, छेडछाडीच्या घटना होऊ नये यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकाºयांनीही गस्त घालावी अशा सुचना अधिक्षकांनी संबंधित पोलीस ठाण्यांना केल्या आहेत. दमण दारू डहाणूत बेकायदेशीररित्या येवू नये म्हणून डहाणू पोलीस तसेच राज्यउत्पादन शुल्क विभागाने सर्वत्र नाकाबंदी केली आहे. पालघर जिल्ह्यात महिन्याभरात (डिसेंबर) सव्वाकोटीच्या दमणदारूसह २५ वाहनेही जप्त केल्याचे उत्पादन शुल्क अधिक्षक डॉ. बूकन यांनी सांगितले.
डहाणूत हॉटेल्स, फार्म हाउस, रिसॉर्ट हाउसफुल्ल
By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2018 2:56 AM