पालघर : दलित वस्ती योजनेंतर्गत आलेल्या निधीतून दलितांच्या कल्याणासाठी विकासात्मक कामे होणे अपेक्षित असताना पालघर नगरपरिषदेने नवली रेल्वे फाटक ते भिमाईनगर हा रस्ता दलित वस्तीला जोडतो या सबबीखाली ८४ लाखाचा निधी वापरून कोणाचे हित साधले असा प्रश्न टेंभोडे व भिमाई नगरमधील रहिवाशांनी उपस्थित केला आहे व या रस्त्याचा ठराव घेणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे.दलितांच्या वस्तीला पायाभूत सुविधा निर्माण करून देत त्याला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी शासनाच्या वतीने दलित वस्ती निधी हा राखीव निधी दरवर्षी वापरला जातो. पालघरमध्ये नगरपरिषद हद्दीत भिमाईनगर, नवली, आंबेडकरनगर (पूर्व) आंबेडकरनगर टेंभाडे या प्रमुख वस्त्या दलित वस्ती योजनेमध्ये अंतर्भूत आहेत. या दलित वस्तीच्या विकासासाठी आलेला निधी नगरसेवक, मुख्याधिकारी व कर्मचारी वर्ग जाणूनबुजून बेमुर्वतपणे दुसऱ्या कामासाठी वापरीत असल्याची तक्रार टेंभाडे आंबेडकरनगरमधील रहिवाशांनी तत्कालीन जिल्हाधिकारी अभिजीत बांगर यांच्याकडे केली आहे. आम्ही आमच्या मनमानीप्रमाणे व मर्जीप्रमाणे सदर निधीचा वापर केला तर आमचे कुणीही वाकडे करू शकत नाही. असा समज नगरपरिषद प्रशासनाचा झाल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.(वार्ताहर)वास्तविक हे काम नगरपरिषदेच्या सर्वसाधारण निधीमधून होणे अपेक्षित असताना ८४ लाखांच्या दलित वस्ती योजनेचा पैसा या रस्त्यासाठी वापरून पालघर नगरपरिषदेचे दलित समाजाला विकासाच्या प्रवाहातून दूर सारण्याचे काम केल्याचा आरोपही नागरिकांमधून केला जात आहे.
दलित वस्ती सुधार निधी भलत्याच रस्त्यावर खर्ची
By admin | Published: May 04, 2016 1:27 AM