मीरारोड- भाईंदर पश्चिम भागातील एक जुनी धोकादायक ठरवलेली इमारत पाडताना लगतच्या झोपडपट्टीतील तीन घरांवर इमारतीचा काही भाग कोसळून नुकसान झाले. इमारत पाडताना आवश्यक सुरक्षा उपाय केले नाहीतच शिवाय धुळीचे प्रदूषण होऊ नये म्हणून देखील पालिका निर्देशांचे उल्लंघन केल्याने परिसरात धुळीचे साम्राज्य पसरले. भाईंदर पश्चिमेस सेकंडरी शाळेच्या समोर आनंद लक्ष्मी हि ४ मजली इमारत पालिकेने धोकादायक म्हणून घोषित केलेली आहे. पालिकेने सदर इमारतीला नोटीस सुद्धा बजावली होती. इमारतीच्या गृह निर्माण संस्थे कडून सदर इमारत पाडण्याचे काम शनिवारी सुरु होते.
पोकलेनच्या सहाय्याने इमारत तोडताना काही भाग कोसळून लगतच्या नेहरू नगर मधील तीन बैठ्या घरांवर पडला. त्यात घरांच्या भिंतींना तडे गेले पण त्यावेळी घरात कोणी नसल्याने कोणती जीवित हानी झाली नसल्याचे रहिवाश्यानी सांगितले. सुरक्षेचे कोणतेच आवश्यक उपाय न करता अश्या पद्धतीने इमारत पाडताना दुर्घटना घडल्या बद्दल रहिवाश्यांनी संताप व्यक्त केला. जुनी जीर्ण इमारत आणि आजूबाजूला घरे असल्याने नियंत्रित पद्धतीने इमारत तोडणे आवश्यक होते असे त्यांनी बोलून दाखवले.
दरम्यान, पाडकाम करताना डेब्रिसची मानवी आरोग्याला घातक अशी धूळ हवेत पसरू नये म्हणून सर्व बाजूनी ग्रीन मॅट सह आवश्यक उपाययोजना प्रदूषण रोखण्यासाठी करणे आवश्यक होते. शासनापासून पालिकेने देखील त्या संदर्भात मार्गदर्शक सूचना जरी केलेल्या होत्या. परंतु त्या कडे देखील डोळेझाक करण्यात आल्याने सर्वत्र धुळीचे साम्रज्य पसरून लोकांना श्वास घेणे सुद्धा काहीकाळ अवघड झाले होते.