अनिरुद्ध पाटील बोर्डी : आगामी लोकसभा निवडणूक आणि लग्नसराईच्या पाशर््वभूमीवर मोठ्या प्रमाणात दमण बनावटीच्या मद्य तस्करीला उधाण येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्या अनुषंगाने या अवैध धंद्यात गुंतलेल्यांच्या हालचालींना वेग येणार आहे. त्यामुळे उत्पादन शुल्क विभागाला सतर्क राहावे लागणार आहे.महाराष्ट्र गुजरात सीमा भागातील डहाणू आणि तलासरी तालुक्यातून मोठ्या प्रमाणात दमण बनावटीच्या मद्याची अवैध तस्करी केली जाते. आगामी लोकसभा निवडणुका आणि लग्नसराई लक्षात घेता, आतापासून या तस्करीला ऊत येणार आहे. दमण येथे विविध नामांकित ब्रँडच्या नावाचा वापर करून, बनावट बियर आणि व्हिस्की त्यामध्ये भरले जाते. त्यानंतर तेथील एजंटाच्या माध्यमातून गुजरात मार्गे महाराष्ट्रात ते पाठविले जाते. याकरिता डहाणू आणि तलासरी तालुक्यातील बेरोजगार तरुणांचा वापर केला जातो. त्यांना या परिसराची खडानखडा माहिती असते. शिवाय एखादी जबाबदारी सोपवल्यास ती पार पाडण्याकरिता ते जिवाची बाजी लावतात. हल्ली त्यांना अत्याधुनिक मोबाईल आणि भेटवस्तूंचे आमिष दाखवले जाते. त्यामुळे या व्यवसायाकडे हे तरुण आकर्षित होऊन धोका पत्कारतात. शिवाय स्थानिक पातळीवर चिरीमिरी किंवा दरमहा ठराविक रकमेचा हफ्ता दिला जात असल्याने तस्करी करणारी वाहनं पुढे पाठवली जात असल्याची चर्चा आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात कारवाई होतांना दिसत नाही. गुजरात राज्यात दारूबंदी असतांना या परिसरातून तस्करी होत असल्याने या अवैद्य धंद्याला पाठबळ मिळत आहे.त्यानंतर मुंबई अहमदाबाद मार्गावरील तलासरी तालुक्यातील आच्छाड, उधवा तर किनारपट्टीलगत झाई हे मार्ग कुप्रसिद्ध आहेत. रात्री किंवा पहाटे ही वाहनं महाराष्ट्रात दाखल झाल्यानंतर गुप्त मार्गाने जंगलात जातात. तेथे हा माल उतरविला जातो. त्यानंतर त्याचे वितरण पालघर, मुंबई, रायगड या भागात केले जाते. मागील दोन-तीन वर्षांपूर्वी तलासरीतील जंगलपट्टी भागात रात्रीच्या सुमारास दारूसाठा उतरविला जात असल्याची खबर उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती. त्यांनी धाड टाकली, परंतु या पथकावर दगडफेक करण्यात आली होती. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना जीव मुठीत घेऊन काम करावे लागत आहे. तर या अवैध व्यवसायात बड्या हस्तीचा वरदहस्त असल्याशिवाय ही तस्करी अशक्य वाटते.दरम्यान आगामी निवडणुका व लग्नसराई लक्षात घेता राज्य उत्पादन शुल्क विभागाने या करिता कंबर कसली असून त्या दृष्टीने नियोजन सुरू असल्याची माहिती एका अधिकाऱ्याने खाजगीत सांगितली.डहाणू कार्यालयाने डिसेंबर महिन्यात २५ लक्ष रु पये किमतीचे तर जानेवारी ते मार्च या काळात ६ लक्ष रुपये किमतीच्या दमण बनावटीचा अवैध मद्यसाठा तलासरी, चारोटी या पट्यातून जप्त केला आहे.>या कारवाई बाबत मुंबईतील दोन पथके आणि डहाणू कार्यालयाचे कर्मचारी गस्त घालण्याचे काम करीत आहे. झाई व तलासरी या ठिकाणांवर विशेष लक्ष असेल. अवैध तस्करी विषयी खबर मिळाल्यास कारवाई करण्यात येईल.- ए. व्ही. सोनावणे (प्रभारी निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क विभाग, डहाणू
निवडणूक पार्श्वभूमीवर दमण मद्य तस्करीला उधाण
By ऑनलाइन लोकमत | Published: March 06, 2019 12:18 AM