- लोकमत न्यूज नेटवर्कपालघर : हायवेपासून पाचशे मीटरच्या परिसरात दारु विक्रीवर बंदी आल्याने तळीरामांचे वांधे झालेले नाहीत. कारण विक्रमगड परिसरामध्ये नाक्यानाक्यावर असणाऱ्या चायनिज ठेल्यांवर दमण दारुची सर्रास विक्री सुरु असून दामदुप्पट नफा कमावला जात आहे. शासनाने दारुविक्री परवाधारकांना अंतराचा निकष लावल्याने दारु दुकानांच्या संख्येवर मर्यादा आल्या होत्या. मात्र, पोलिस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर खुलेआम दारुची विक्री सुरु आहे.येथे नव्याने रुजू झालेले पोलिस निरिक्षक पवार यांनी याबाबत ठोस भूमिका घेण्याचे आश्वासन दिले होते मात्र तसे झालेले नाही़ अबकारी खात्याचा यावर वचक असायला हवा मात्र, त्यांचे कार्यालय पालघरला असल्याने येथे कुणाचेही लक्ष नसते. काही ठेल्यांवर महिला स्वत: मद्यविक्री करीत असल्याने तेथे छापा मारण्यास पोलिसही धजावत नाहीत. गटारी काही दिवसांवर आलेली असतांना या भागात महाराष्टात बंदी असणाऱ्या दमणच्या दारुचा मोठ्याप्रमाणात पुरवठा सुरु आहे.विक्रमगड व परिसरामध्ये हातभट्टी बनविली जाते. व त्याकरीता लागणारा काळा गुळ आणि नवसागर, मोहाची फुले यांचीही विक्री जोमाने होत आहे़ यावर कुणाचाही अंकुश नसल्याने या भागात असे प्रकार राजरोस सुरू आहेत़ विशेष म्हणजे या भागामध्ये असणाऱ्या आदिवासी पाड्यांमध्येही दारु सर्रास विकली जात असून पोलीस कारवाईचे नामोनिशानही आढळत नाही. या भागात दारु पकडल्याच्या केसेसही घडत नाहीत. त्यामुळे सध्या विक्रमगडध्ये मध्ये गटारीची धामधूम सुरु असून जोमाने दारु विकी सुरु आहे़विक्रमगड हायस्कुलपासून १०० मीटर अंतरावर चायनिजचे दुकाने असून त्याच्या पाठीमागे दमण बनावटी दारु पिण्याची व्यवस्था केलेली दिसत आहे़ दारु सोबत चायनिजची सोय असल्याने तळीराम बिनधास्त दारु सेवन करीत आहे. विक्रेते बिनधास्त विक्री करीत आहे़ हा प्रकार मनोर रस्त्याच्या कडेला घडत असतांनाही पोलिसांचे दुर्लक्ष आहे़ तसेच विक्रमगड मुख्य बाजारामध्ये देखील दारुची खुलेआम विक्री होतांना दिसत आहे़ याचा त्रास या परिसरातून जाणाऱ्या-येणाऱ्या व तिथे राहणाऱ्या नागरिकांना होतो आहे. त्यामुळे त्यांच्यात संताप खदखदतो आहे.विक्रमगडमध्ये आमचे अधिकारी गेल्या दोन तीन दिवसांपासून आहेत. चायनिज ठेल्यांवर, किराणा दुकानातून दमण दारुची विक्री होतांना आढळल्यास आम्ही कडक कारवाई करु. सगळी माहिती घेऊन उद्याच तसे आदेश मी देणार आहे. - विठ्ठल लेंगरे, पोलीस अधिक्षक, राज्य उत्पादन शुल्क विभाग, पालघर
विक्रमगडमध्ये दमण दारुची विक्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2017 2:07 AM