- हुसेन मेमन जव्हार : जव्हार हे उंच ठिकाण असल्यामुळे पावसाळ्यात या ठिकाणी कितीही पाऊस पडला तरीही फेब्रुवारी महिन्यापासूनच पाणी टंचाईला सुरवात होते. जव्हार शहरासाठी पिण्याच्या पाण्यासाठी एकमेव असलेला पिण्याचा पाण्याचा स्त्रोत जयसागर डॅम आहे. मात्र जयसागर डॅमच्या कॅचमेट परिसरालगत नवीन बंगले, घरे, आदी खाजगी बांधकामाचा सुळसुळाट झाला असून प्रसारमाध्यामांनी यापूर्वी प्रशासनाच्या लक्षात हे आणून दिल्यानंतर ग्रामपंचायतीला नोटिसा देवून काही बांधकामे थांबविण्यात आली होती. मात्र पुन्हा काही महिन्यात जैसे थेच सुरु झाले आहे. जयसागर डॅम कॅचमेट परिसरात दिवसेंदिवस वाढलेल्या रहदारीमुळे डॅममधील पाणी दूषित होवून काही वर्षातच पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण होवू शकतो. असे नागरिकांचे म्हणणे आहे.जयसागर डॅमचा हा कॅचमेट परिसर कासटवाडी ग्रामपंचायत हद्दीत येत असून, येथील ग्रामसेवक व सरपंच यांनी या परिसरातील सुरु असलेली बांधकामे थांबविण्यासाठी नोटिसा बजावल्या आहेत. डॅम परिसरात सुरु असलेली बांधकामे तात्काळ थांबवावीत अशी मागणी केली आहे.नगरपरिषदेतील १३ हजार नागरिकांची तहान भागविणारा हा डॅम आहे. मात्र कन्स्ट्रक्शन वाढले तर भविष्यात डॅम मधील पाणी खराब होवून जव्हारांसाठी पाणीटंचाई निर्माण होईल. त्यामुळे मुख्याधिकारी, नगराध्यक्ष आणि कासटवाडीचे सरपंच यांनी तात्काळ लक्ष घालून सुरु असलेली इमाराती व घरांची बांधकामे थांबवावित अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.जव्हार नगरपरिषदेतील नागरिकांचा पिण्याच्या पाण्यासाठीचा एकमेव स्त्रोत हा जयसागर डॅम असून, त्याच्याच पाण्यावर जव्हार शहरातील १३ हजार लोकसंख्येला अवलंबून राहावे लागत आहे.परिसरातील २५ हजार नागरिकांची तहान तो भागवितो डॅमच्या कॅचमेट परिसरात घरे, बंगले वाढल्यामुळे वाहतूक व प्रदूषण दोनही वाढले आहेत. जर ही स्थिती कायम राहिली तर पेयजलाचा हा एकमेव स्त्रोत संपुष्टात येईल त्याबाबत आताच जागे होण्याची आवश्यकता आहे. अन्यथा काही वर्षात तर काही वर्षातच धरणात अडविण्यात येणारे पाणी दूषित होवून जव्हारकरांचा पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण होईल.>आमची जागा देखील जयसागर डॅम पाणलोट क्षेत्रात आहे. त्यामुळे आम्हालाही ग्रामपंचायत कासटवाडी आणि नगररिषदेने रिसॉर्ट बांधायला परवानगी द्यावी. तसेच अन्य लोकांनीही घरे बांधण्यासाठी जागा घेतल्या आहेत. त्यांनाही परवानगी द्यावी. किंवा सगळ्यांना सारखा न्याय लावून सुरु असलेली इमारती व घरांची बांधकामे थांबवावी.- गुलाब विनायक राऊत,जि. प. सदस्य>जयसागर डॅम पाणलोट क्षेत्रातील खाजगी जागेत इमारती व घरांची जी बांधकामे सुरु आहेत. ती तातडीने थांबविण्यासाठी ग्रामपंचायतीने नोटिसा दिल्या आहेत.- मिलिंद गायकवाड, ग्रामसेवक>मला आताच चार्ज मिळाला असून, या विषयी मी आमच्या संबधित कर्मचाऱ्यांकडून अधिक माहिती घेवून सांगतो.- प्रसाद बोरीकर, मुख्याधिकारी
जव्हारकरांसाठी धोक्याची घंटा, जयसागरच्या कॅचमेट परिसरात बांधकामे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2018 2:42 AM