विरार : वसई - विरारमध्ये भेसळखोरांनी आपले बस्तान मांडले असून खाद्यपदार्थांत भेसळ करून नागरिकांच्या आरोग्याशी राजरोसपणे खेळ सुरू आहे. असे असतानाही अन्न तसेच औषध प्रशासन अथवा महापालिका आरोग्य विभाग याबाबत गंभीर नाही. बनावट मावा, रासायनिक पद्धतीने फळे पिकवणे, घाणीच्या विळख्यात खाद्यपदार्थ अनेक कारखाने सुरु आहे. विशेष म्हणजे वसईत अन्न व औषध विभागाचे कार्यालय नाही. यामुळे नागरिकांनी तक्र ार करायची कुठे असा प्रश्न निर्माण होत आहे.
वसई तालुक्यातील नालासोपारा येथे चक्क घाणीच्या साम्राज्यात खाकरा बनविणारे शेकडो कारखाने कार्यरत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. अन्न आणि औषध प्रशासनाचे सारेच नियम धाब्यावर बसवून घाणीच्या विळख्यात वेगवेगळ्या स्वादाचे खाकरे बनवून मुंबई, ठाणे, पालघर येथे विक्री केले जात आहेत. मात्र या कारखान्यांवर आजतयागत कोणतीही कारवाई होत नसल्याने नागरिकांच्या आरोग्याचा धोका निर्माण झाला आहे.
खाकरा बनवणारे शेकडो कारखाने मोरगाव, नागीनदास, अलकापुरी, संतोष भुवन परिसरात बिनधास्त सुरु आहेत. त्यातील बहुतांश कंपनीकडे अन्न आणि औषध प्रशासनाचे कोणतेही परवाने नाहीत. तसेच या कारखान्यांची अन्न आणि औषध प्रशासनाकडून कधीच पाहणी केली जात नाही. यामुळे घाणीच्या साम्राज्यात हे लघुउद्योग उभे राहत आहेत.
या कंपनीत रोजंदारीवर महिलांद्वारे वेगवेगळ्या स्वादाचे खाकरे बनविले जातात. आणि कोणत्याही कंपनीच्या नावाने सीलबंद करून मुंबई, ठाणे, पालघर आदी परिसरात वितरित केले जातात. विशेष बाब म्हणजे काही मोठे फरसाणवाले सुद्धा या कंपनीकडून आपले खाकरे बनवून केवळ आपल्या नावाचे पॅकिंग करून सर्रास गुणवंत पदार्थ म्हणून विकतात.मनुष्य बळ कमी असल्याने सर्वच ठिकाणी पाहणी करणे शक्य नाही. तक्र ारी आल्यास आम्ही कारवाई करतो. शासनाने मनुष्यबळ वाढविल्यास भेसळखोरांवर नियंत्रण मिळवणे शक्य होईल. नागरिकांनी असे पदार्थ घेतना सावधानता बाळगावी. - पी.एन. वाघमारे, सहा. आयुक्त अन्न व औषध प्रशासन अधिकारी, ठाणे