नवी मुंबई : वाशी सेक्टर ३० व ३० ए परिसरातील नाल्यांची पावसाळापूर्व कामांतर्गत सफाई करण्यात आली नाही. यामुळे परिसरात नाल्याचे पाणी तुंबून पूरपरिस्थिती उद्भवण्याची भीती लोकप्रतिनिधींनी व्यक्त केली आहे.वाशी रेल्वेस्थानक परिसरात मोठमोठे मॉल असून अनेक कार्यालयीन इमारती देखील त्याठिकाणी आहेत. यंदा जादा प्रमाणात पर्जन्यवृष्टी झाल्यास हा संपूर्ण परिसर जलमय होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महापालिकेतर्फे शहरातील महत्त्वाच्या नाल्यांची सफाई करुन त्यामधील पाण्याचा अडथळा हटवण्यात आलेला आहे. परंतु पावसाळापूर्व कामे पूर्ण होवून बरेच दिवस झाले तरी वाशी सेक्टर ३० व ३० ए परिसरातील नाल्यांची व पावसाळी गटारांची सफाई करण्यात आलेली नाही. यामुळे सदर परिसरात पाणी तुंबून पूरपरिस्थिती उद्भवण्याची शक्यता नगरसेविका फशीबाई भगत यांनी व्यक्त केली आहे. तुंबलेले हे पाणी रेल्वेस्थानक परिसर, बस डेपो, व लगतच्या मॉलमध्ये पूरपरिस्थिती निर्माण करू शकते. ही बाब लक्षात घेवून त्यांनी महापालिका अधिकाऱ्यांना नाल्यातील पाण्याचा अडथळा हटवण्याचे सुचवले आहे. त्यानंतरही सफाईच्या कामाकडे दुर्लक्ष होत असल्याचा संताप भगत यांनी व्यक्त केला आहे. तर यंदाच्या पावसाळ्यात सदर परिसरात पाणी तुंबल्यास त्याला प्रशासन अधिकाऱ्यांनाच जबाबदार धरले जाईल, असेही त्यांनी ठणकावले आहे. वाशीतील प्रकारपावसाळापूर्व कामे पूर्ण होवून बरेच दिवस झाले तरी वाशी सेक्टर ३० व ३० ए परिसरातील नाल्यांची व पावसाळी गटारांची सफाई करण्यात आलेली नाही. यामुळे सदर परिसरात पाणी तुंबून पूरपरिस्थिती उद्भवण्याची शक्यता नगरसेविका फशीबाई भगत यांनी व्यक्त केली आहे. तुंबलेले हे पाणी रेल्वेस्थानक परिसर, बस डेपो, व लगतच्या मॉलमध्ये पूरपरिस्थिती निर्माण करू शकते.
नालेसफाईअभावी पुराचा धोका
By admin | Published: June 16, 2016 1:12 AM