खर्डी : खर्डी केंद्रात जिल्हा परिषदेच्या एकूण १८ प्राथमिक शाळा आहेत. त्यापैकी दोन शाळांचे छप्पर गळत असून स्टेशन येथील शाळा नं. ३ ला वीजवाहिनीमुळे धोका निर्माण झाला आहे. परिणामी, दुर्घटना होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.स्टेशन येथील शाळेच्या वर्गखोल्या स्लॅबच्या असून त्यावरून वीजवाहिन्या गेल्या आहेत. शाळेच्या स्लॅबवर अर्ध्या फुटावर त्या लोंबकळत आहेत. त्यात संपूर्ण शाळेचे छप्पर गळत असल्याने संपूर्ण वर्गात ओल आली आहे. या लोंबकळणाऱ्या तारांमुळे शाळेत वीजप्रवाह उतरून मोठी हानी होऊ शकते. त्यामुळे शिक्षण विभागाने तातडीने उपाययोजना करून शाळेची होणारी हानी टाळावी. तसेच शाळेच्या मैदानात पाणी साचत असल्याने सर्वत्र चिखल झाला आहे. यामुळे विद्यार्थ्यांना स्वच्छतागृहात जाण्यासाठी रस्ता राहिलेला नाही.वर्गखोल्यांच्या खिडक्या तुटलेल्या आहेत. शाळेचे गेट निखळले आहे. अशा अनेक समस्यांनी शाळा ग्रासली असून या शाळेतील विद्यार्थ्यांबरोबरच शिक्षकांना जीव मुुठीत घेऊन शिकवावे लागत आहे.ही बाब गंभीर असून शिक्षण विभाग या शाळेत दुर्घटना घडण्याची वाट बघत आहे का, असा संतप्त सवाल पालक आणि ग्रामस्थ करत आहेत. या सर्व समस्या मुख्याध्यापक प्रेमनाथ दुभेले यांनी शिक्षण विभाग, पंचायत समिती, महावितरण, पोलीस ठाण्याकडे लेखी स्वरूपात दिल्या आहेत. तक्रार करून महिना उलटला तरी शिक्षण विभाग आणि महावितरणने कोणतीही दखल घेतली नाही.खर्डी केंद्रातील तळेखण येथील प्राथमिक शाळेतील वर्गखोल्यांचे छप्पर सिमेंटच्या पत्र्यांचे असून तेही ठिकठिकाणी फुटलेले आहे. त्यामुळे याही वर्गांमध्ये पाणी गळत आहे. या शाळेच्या दुरुस्तीचा प्रस्ताव मुख्याध्यापकांनी वरिष्ठांकडे पाठवला आहे.शाळा नं ३ चे छप्पर गळत असून त्याच्या दुरुस्तीचा प्रस्ताव शिक्षण विभागाकडे पाठवला आहे. मात्र, अद्याप दुरुस्ती झालेली नाही. त्यासाठी पुन्हा शिक्षण विभागाकडे पत्रव्यवहार करून तातडीने छप्पर दुरुस्तीचे काम केले जाईल. तसेच या शाळेच्या इमारतीजवळ विजेच्या तारा लोंबकळत असून त्यामुळे शाळेला धोका निर्माण झाला आहे. त्या हटवण्याबाबत महावितरणला पत्र दिले आहे. - कमल वाळंज, केंद्रप्रमुख, खर्डी
वीजवाहिनीमुळे विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 07, 2019 10:56 PM