वाडा : या तालुक्यातील कुडूस ग्रामपंचायतीच्या हद्दीतील धोडिया या कंपनीच्या वायु व जल प्रदूषणामुळे येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असल्याने कंपनी बंद करण्यात यावी अशी मागणी रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया ( सेक्युलर) या पक्षाने तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
या कंपनीत धाग्याच्या उत्पादना बरोबरच रासायनिक पावडरचे उत्पादन घेतले जाते. या कंपनीतील धूर हा दररोज सोडला जात असल्याने परिसरात वायु प्रदूषण होते. तसेच कंपनी तिचे रासायनिक सांडपाणी बाजूच्याच नाल्यात सोडत असल्याने व पर्यायाने भातशेतीत पसरत असल्याने तिचेही नुकसान होते आहे. नाल्यातील दूषित पाणी वडवली, मुसारणे, घोडविंदे पाडा, घोणसई व डाकिवली यामार्गे ते तानसा नदीत जाते. त्यामुळे नाला व नदीचे पाणी दूषित होऊन मानव व प्राण्यांचे आरोग्य धोक्यात येत असल्याचा आरोप निवेदनात केला आहे. दुषित पाणी झिरपून विहीरी व कूपनलिकेत जात असल्याने त्यातीलही पाणी प्रदूषित झाले असावे असाही अंदाज त्यांनी वर्तवला आहे.कंपनीपासून होणारे वायू व जल प्रदूषणामुळे नागरिक व प्राण्यांच्या आरोग्यास कसा व कोणता धोका उत्पन्न झाला आहे याची पाहणी करून कंपनीवर कारवाई करून ती बंद करावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. तत्काळ कारवाई न केल्यास पक्षातर्फे तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. आता प्रशासन यावर कोणती कारवाई करते याकडे सगळ्यांचेच लक्ष लागून राहिले आहे.आमच्या कंपनीचे सांडपाणी नाल्यात सोडले जात नाही. कुठल्याही प्रकारचे प्रदूषण कंपनी पासून होत नाही. हे आरोप बिनबुडाचे आहेत.- उमाकांत पांडा, व्यवस्थापक,धोडीया कंपनी