पारोळ : वसई तालुक्यातून जात असलेल्या मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील वाहनचालकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असून, यामुळे अपघातांत वाढ होत असल्याने निरपराध नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे. या मार्गावर मार्गदर्शक पट्टे धूसर असून यात मार्गावर येणारी सातीवली, वसई फाटा, नालासोपारा फाटा, पेल्हार, विरार फाटा, शिरसाड या उड्डाणपुलांच्या आत दिवे नाहीत, तसेच या सर्व उड्डाणपुलांजवळ अवैध पार्किंग होत असल्याने वाहतुकीस मोठा अडथळा येतो, तसेच या मार्गावर भटक्या गुरांचाही मुक्त संचार होत आहे.
मुंबई-अहमदाबाद महामार्गावर वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात असते, मात्र या मार्गावर मार्गदर्शक पट्टे दिसत नाहीत. वाहने भरधाव वेगात धावत असल्याने अपघात घडण्याची शक्यता असून मार्गदर्शक पट्टे लावण्याची मागणी वाहनचालकांतर्फे जोर धरू लागली आहे. भटक्या जनावरांचा वावर, उड्डाणपूल आणि पथदिव्यांचा अभाव त्याचबरोबर सुरक्षित जाळ्या नसल्याने येथील नागरिकांची गैरसोय होत आहे. या भागात म्हणजेच वसई सातिवली, खानिवडे टोलनाका या रस्त्यांवर मार्गदर्शक पट्टेच नसल्याचे दिसून आले आहे. त्यातच रस्त्याच्या कडेला अवजड वाहने उभी असतात, सोबत वाहतूककोंडीही असल्याने चालकांना रस्त्याचा अंदाज येत नाही. या मार्गावर दुचाकीने प्रवास करणारेही अनेक जण आहेत. अवजड वाहने नजीक येताच त्यांची भीतीने तारांबळ उडते. अनेकदा वाहने घसरणे, अपघात होणे अशा घटना घडतात. थंडी सुरू झाल्याने मार्गावर धुकेही असते. अशा वेळेस मार्गदर्शक पट्टे नसल्याने अडचणींत वाढ होत आहे.
इस्पितळ नसल्याने चिंताएखादी दुर्घटना घडल्यास महामार्गावर इस्पितळ नसल्याने मुंबई किंवा वसईच्या रुग्णालयात नेण्यासाठी अधिक वेळ लागतो. यामध्ये रुग्ण दगावण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा धोकादायक रस्त्यांवरून वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.