भार्इंदर : मीरा-भार्इंदर शहरातील चारशेहून अधिक शाळांच्या इमारतींचे स्ट्रक्चरल आॅडिट करण्याचे निर्देश पालिका आयुक्त बालाजी खतगावकर यांनी शिक्षण विभाग तसेच प्रभाग अधिकाऱ्यांना दिले आहेत. धोकादायक स्थितीमधील इमारतीत सुरू असलेल्या शाळा तत्काळ बंद करण्यास त्यांनी सांगितले.पालिका हद्दीत सुमारे चारशेहून अधिक खाजगी शाळा सुरू आहेत. त्यात २३२ खाजगी प्राथमिक शाळा, १२५ माध्यमिक शाळा, १२ पर्यंतच्या खाजगी शाळांची संख्या ४५ व १२ महाविद्यालये व २ तंत्रमहाविद्यालयांचा समावेश आहे. पालिकेच्या २२ इमारतींत विविध माध्यमांच्या ३६ शाळा सुरू आहेत. शहरातील कित्येक खाजगी शाळा स्वतंत्र इमारतीऐवजी निवासी इमारतीत सुरू आहेत. खाजगी शाळा स्वतंत्र इमारतीत असाव्यात, यासाठी राज्य सरकारने केलेले नियम धाब्यावर बसवून या शाळा सुरू आहेत. निवासी इमारतीमध्ये सुरू असलेल्या शाळांच्या इमारती जर्जरावस्थेत आहेत. अनेकदा नोटिसा पाठवूनही त्या रिकाम्या केल्या जात नाहीत. अशा शाळांची तात्पुरती दुरुस्ती केली जाते. पालिकाही या शाळांतील मुलांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये, यासाठी त्या इमारतींना किरकोळ दुरुस्तीची परवानगी देते. या धोकादायक शाळांमध्ये शिक्षण घेणाºया विद्यार्थ्यांच्या जीविताला धोका होण्याची शक्यता आहे. यापूर्वी पालिकेने धोकादायक इमारतींमधील काही शाळा बंद केल्या. मात्र, शाळा व्यवस्थापन आणि स्थानिक राजकीय नेत्यांनी त्याला विरोध केला. यंदा पावसाळा सुरू होण्यापूर्वी शाळांची तपासणी पूर्ण करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत.शिक्षण विभागाने सर्व खाजगी शाळांची बैठक घेण्यास सुरुवात केली असून शाळेची इमारत सुस्थितीत असल्याची माहिती पुरवण्याच्या सूचना केल्या आहेत. प्रसंगी विभागाकडून शाळांच्या इमारतींची पाहणी केली जाणार आहे. - सुरेश देशमुख, सहायकशिक्षणाधिकारी, मीरा-भार्इंदर महापालिका
धोकादायक शाळा बंद होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2018 2:20 AM