बोईसर : महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होऊन आज एवढे दिवस उलटून गेले तरी खातेवाटप जाहीर होत नसून या सरकारमध्ये संवादापेक्षा विसंवादच अधिक आहे, अशी जोरदार टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी बोईसर येथे पत्रकार परिषदेत केली.पालघर जिल्ह्याच्या ७ जानेवारीला जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दरेकर हे शनिवारी पालघर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. या वेळी त्यांनी जिल्ह्यातील भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते व उमेदवारांच्या गाठीभेटी व बैठका घेऊन त्यांना मार्गदर्शन केल्यानंतर त्यांनी बोईसर येथील रेयांश होटेलमध्ये पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी आ.भाई गिरकर, पालघर जिल्हा परिषदेचे कृषि सभापती अशोक वडे, शिवशक्ती सामाजिक संघटनेचे ज्येष्ठ नेते संजय पाटील, पंचायत समिती सदस्य जितेंद्र संखे व वीणा देशमुख, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत पाटील, तालुका अध्यक्ष प्रमोद आरेकर आदी उपस्थित होते.मागील पाच वर्षांमध्ये मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांनी पालघर जिल्ह्यातील विशेषत: आदिवासीसाठी विशेष योजना राबवून जिल्ह्यासह या राज्याला प्रगतिपथावर नेण्याचे प्रामाणिक काम केल्याने पालघरवासीयांना आपला मुख्यमंत्री व्हावा असे वाटते होते आणि त्यामुळेच पालघर जिल्हा परिषदेवर भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकेल, असे चित्र या ठिकाणी दिसत असल्याचा आशावाद त्यांनी व्यक्त केला.पाच वर्षाच्या कार्यामुळे महाराष्ट्राच्या जनतेने जनाधार दिला होता, परंतु दुर्दैवाने ज्या एका विचारधारेवर भाजप व शिवसेना एकत्र होती ती विचारधारा सोडून शिवसेनेने ज्यांच्याबरोबर आयुष्यभर संघर्ष केला त्या काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर एकत्र येऊन सत्तेसाठी महाविकास आघाडी बनवण्यात आली, असे दरेकर यांनी सांगितले. ती आघाडी बनविल्यानंतर काय चित्र आहे ते आज संपूर्ण महाराष्ट्र बघत आहे, असेही ते म्हणाले.>महिना-दीड महिन्यात ज्या निवडणुका झाल्या त्यामध्ये भाजपला मोठे यश मिळाले. त्यामुळे जनतेचा ट्रेंड हा भाजपच्या मागे आहे म्हणून पालघर जिल्हा परिषद सुद्धा भाजप व राज्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असून या जिल्ह्यातील नागरिक हे भाजपच्या मागे उभे राहतील, असे दरेकर म्हणाले.
सरकारमध्ये संवादापेक्षा विसंवादच- दरेकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 05, 2020 1:39 AM