विरार : अर्नाळा समुद्रकिनारी रात्रीच्या अंधारात होत असलेल्या रेतीचोरीमुळे अर्नाळावासीयांनी चिंता व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यासमोरच रेतीमाफिया धूडगूस घालत असतानाही पोलिसांना याची खबर नसल्याने आश्यर्च व्यक्त केले जात आहे. अर्नाळा समुद्रकिनारी होत असलेल्या या रेतीचोरीकडे लक्ष वेधण्यासाठी व कारवाई केली जावी, यासाठी अर्नाळा ग्रामपंचायतीने महसूल आणि अर्नाळा पोलिसांना १९ जुलै व ६ ऑगस्ट २०१८ साली पत्र दिले होते; मात्र अद्याप या पत्रावर कोणतीही कारवाई झालेली नसल्याचे ग्रामपंचायतीचे म्हणणे आहे.
अर्नाळा समुद्रकिनारी राजरोस होत असलेल्या रेतीचोरीमुळे समुद्र किनाऱ्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. या ठिकाणी येणारे पर्यटक समुद्रस्नानासाठी गेल्यास त्यांना या खड्ड्यांचा अंदाज येत नाही. परिणामी, त्यांचा बुडून मृत्यू होतो. अशाप्रकारे आतापर्यंत या ठिकाणी अनेकांचे जीव गेले आहे.सततच्या रेतीउपशामुळे परिसरातील घरांत समुद्राचे पाणी शिरण्याचा धोका निर्माण होण्याची भीती अर्नाळा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. तर, परिसरातील शेती आणि विहिरीचे पाणीही खारट होत असल्याची या ग्रामस्थांची तक्रार आहे. महसूल व पोलीस प्रशासनाने तातडीने या रेतीचोरांवर कारवाई करावी, अशी मागणी अर्नाळा ग्रामपंचायतीने या पत्राद्वारे केली होती. अन्यथा; ग्रामस्थांच्या संतापाचा उद्रेक होईल, अशी भीतीही व्यक्त केली होती.
अर्नाळा ग्रामपंचायतीने २०१८ साली पत्र दिले असेल, तर आमच्या कार्यालयाने काय कारवाई केली, हे पाहावे लागेल. याबाबत माहिती घेते.- उज्ज्वला भगत, तहसीलदार, वसई
आम्ही सातत्याने अशी कारवाई करत असतो. आजही आम्ही कारवाई करण्यासाठी गेलो होतो; पण असा काही प्रकार आमच्या निदर्शनास आलेला नाही. असा काही प्रकार घडत असल्याचे ग्रामपंचायतीच्या निदर्शनास आले असेल, तर त्यांनी आमच्या निदर्शनास आणून द्यावे, आम्ही नक्की कारवाई करू.- महेश शेट्टे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, अर्नाळा सागरी पोलीस ठाणे