हितेन नाईक
पालघर : आपल्या कुटुंबियांच्या उदरनिर्वाहाचे एकमेव साधन असलेल्या टांग्याचा एक घोडा उपासमारीने मृत झाल्याने आर्थिक संकटात सापडलेल्या शिरगावच्या विधवा महिला सईदा शेख हिला एक घोडा खरेदी करून देत स्पर्श फाउंडेशनच्या संगीता धोंडे यांनी दाखविलेल्या माणुसकीचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
जिल्ह्यातील पालघरसह सातपाटी, शिरगाव, वडराई आदी भागातील अनेक लोक अनेक वर्षांपासून घोडागाडी (टांगा) व्यवसायातून मिळालेल्या उत्पन्नातून कुटुंबीयांचा उदरनिर्वाह चालवीत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात लॉकडाऊन झाल्याने बाजारपेठा, दुकाने बंद करण्यात आल्याने या व्यवसायावर मोठे गंडांतर आले आहे. ज्या व्यवसायावर आपल्या कुटुंबीयांचा उदरनिर्वाह चालतो, तोच व्यवसाय बंद पडल्याने दोन वेळच्या जेवणाची भ्रांत त्या व्यावसायिकांना पडली आहे. आपल्या कुटुंबियांनाच दोन वेळचे जेवण मिळणे मुश्कील झाल्याने या घोड्यांना खायला कुठून अन्न पुरवायचे, असा प्रश्न त्या घोडा मालकापुढे निर्माण झाला होता. शेवटी त्यांना चरण्यासाठी मोकळे सोडल्यानंतरही त्यांना चणे, भुसा आदी नेहमीचा होणारा अन्नाचा पुरवठा बंद झाल्याने अनेक घोड्यांची प्रकृती खालावली होती. त्यातच त्यांना निर्माण झालेल्या आजारावर उपचार करण्यासाठी शहरातील पशुवैद्यकीय दवाखान्यात जाणेही लॉकडाऊन आणि अवास्तव खर्चामुळे शक्य नसल्याने या भागात पाच घोड्यांचा उपासमारीने व वेळीच औषधोपचार न झाल्याने मृत्यू झाला होता. यासंदर्भात ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्ताची दखल घेत संगीता धोंडे, समाजसेविका वैशाली ऊर्फ लिनेट चव्हाण, मनसेच्या तुलसी जोशी आदींनी संकटात सापडलेल्या घोडा व्यावसायिकांना खाद्य पुरविले होते.
शिरगावच्या सईदा शेख यांच्या पतीचा अकस्मात मृत्यू झाल्यानंतर मुलगा सिकंदरला सोबत घेत तिने आपला टांग्याचा व्यवसाय पुढे सुरू ठेवला. मात्र अचानक लॉकडाऊनमुळे व्यवसाय बंद पडून घोडाही मरण पावल्याने या कुटुंबियांचे आर्थिक गणितच कोलमडले होते. एका घोड्याच्या सहाय्याने टांगा हाकायचा कसा? असा प्रश्न त्यांच्यापुढे पडला होता. पालघरच्या स्पर्श फाउंडेशनच्या अध्यक्षा संगीता धोंडे, त्यांचे पती भरत धोंडे, मुलगी सुरभी धोंडे यांच्या प्रयत्नाने त्यांनी जिल्ह्यातील एका गरजू व्यक्तीकडून एक घोडा विकत घेत सईदाच्या स्वाधीन केला. रमजानच्या पवित्र महिन्यात ‘अल्ला’ने आपली हाक ऐकून आपल्या घरचे डळमळलेले अर्थचक्र पुन्हा सुरळीत सुरू ठेवण्यासाठी आपल्याला अनमोल भेट पाठविल्याने त्यांनी धोंडे कुटुंबियांसह अल्लाचे आभार मानले.