मनोर : महसूल प्रशासन आणि पोलिसांनी केलेल्या संयुक्त कारवाईत वैतरणा खाडी पात्रात अवैध रेती उत्खनन करणाऱ्या दोन फायबर बोटी आणि एक सक्शन मशीन जप्त करण्यात आली. मंगळवारी हलोली यथे वैतरणा खाडी हालोली व बहाडोली रेती बंदरावर ही कारवाई करण्यात आली.
मंगळवारी झालेल्या कारवाईची प्रक्रीया लांबल्याने अंधार पडला. जप्त करण्यात आलेल्या फायबर आणि सक्शन मशीन असलेल्या दोन्ही ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. बुधवारी पहाटेच्या अंधारात हालोली रेती बंदरात पोलिसांच्या बंदोबस्तात ठेवलेली फायबर माफियांनी पळवून नेली . नौका ताब्यातून पळवल्याचे कळताच पोलिसांची धावपळ उडाली. सकाळपासून सर्च अभियान राबविल्यानंतर गिराळे रेती बंदरात पळवलेली फायबर बोट आढळून आली. जप्त करण्यात आलेली सक्शन मशीन आणि फायबर बोट गॅस कटरने नष्ट करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली.
पोलीस बंदोबस्तात जप्त करून ठेवण्यात आलेली नौका पळवून नेण्यापर्यत रेतीमाफियांची मजल गेल्याने पोलिस यंत्रणेचा धाक संपल्याचे काहींनी सांगितले. याप्रकरणी मनोर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला. वन विभागाच्या स्पीड बोटीने मनोरच्या पोलीस स्टेशनच्या प्रभारी अधिकारी सिद्धवा जायभाये, सफाळे पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी, तलाठी नितीन सुर्वे आणि मनोर पोलीस स्टेशनचे कर्मचारी यांनी कारवाई केली.