आशिष राणे
वसई - वसईतील डी मार्ट मॉलच्या ग्राहकाने खरेदी केलेल्या अर्धा किलो गुळाच्या ढेपेमध्ये चक्क एक मेलेली सुकलेल्या अवस्थेतील पाल आढळून आल्याने नागरिकांमध्ये 'डी मार्ट' मॉल बद्दल आरोग्याच्या दृष्टीने असुरक्षेची भावना निर्माण झाल्याचा धक्कादायक प्रकार ग्राहकाच्या सतर्कतेमुळे शिवसेनेने उघडकीस आणला आहे. वसई भाबोळा स्थित डी मार्ट या मॉलबाबत काही काळापासून अनेक तक्रारी येत होत्या काही व्हाट्सअँपचा माध्यमातून तर काही शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष व अन्य शाखेत येत होत्या.
सर्वसामान्य लोकांच्या जीवाशी व आरोग्यास हानिकारक असाच एक प्रकार वसईतील दत्तानी येथे राहणारे जय नामदेव या सतर्क ग्राहकाने खरेदी पश्चात पुढे आणला आहे. या संदर्भात नवघर पूर्वेच्या किरण चेंदवणकर यांनी लोकमत'ला दिलेल्या माहितीनुसार, 13 जून रोजी जय नामदेव या ग्राहकाने डी मार्ट मधून अर्धा किलो गुळाची ढेप खरेदी केली होती आणि घरी आल्यावर तिचे पेकिंग फोडल्यावर त्यात चक्क त्यांना सुकलेल्या अवस्थेतील मेलेली पाल आढळून आल्याने त्या ग्राहकांनी लागलीच शिवसेनेचे स्टेला येथील स्थानिक विभाग प्रमुख नरेश पुलीपाटी यांचाकडे पावती व वस्तू सहीत धाव घेत तक्रार केली.
परिणामी शिवसेनेने या प्रकरणी त्वरित दखल घेऊन डी मार्ट च्या कार्यालयाला धडक दिली. या प्रसंगी वसई विधानसभा संघटक विनायक निकम, महिला जिल्हा संघटक किरण चेंदंवणकर, विभाग प्रमुख नरेश पुलीपाटी आदीं शिवसैनिकांनी सर्वप्रथम डी मार्टचे व्यवस्थापक सुनील शिंदे यांना घडल्या प्रकाराविषयी जाब विचारला असता शिंदे यांनी सारवासारव करीत सांगितलं की, याबाबत आमचे वरीष्ठ अधिकारी त्या गूळ बनवणाऱ्या किंजल कंपनीशी बोलणार आहेत. तसेच, यापुढे असे प्रकार होणार नाहीत याची आम्ही खबरदारी घेऊ व आमच्या वरिष्ठकडून जो निर्णय येईल तो आपणास लेखी कळवू. तुर्तास आम्ही माल बदलून देतो, असे स्पष्ट केलं होत.
शिवसेना नेते विनायक निकम व महिला संघटक किरण चेंदवणकर यांनी डी मार्ट व्यवस्थापनाला इशारा देताना सांगितले की, आपण वस्तू विक्री करतात व वस्तू ज्या कंपनीकडून येतात. त्यामुळे तुम्ही दोघेही या घटनेस तितकेच जबाबदार आहेत. त्यामुळे कारवाई झालीच पाहिजे. या संदर्भात विभाग प्रमुख नरेश पुलिपाटी यांनी डी मार्ट व किंजल कंपनी या दोघांवर कडक कारवाई करण्यासाठी अन्न आणि औषध प्रशासनाचे ठाणे जिल्हा आयुक्त यांना लेखी तक्रार केली आहे. तसेच यापुढे अशी घटना घडल्यास शिवसेना त्यांच्या स्टाईलने उत्तर दिलं जाईल. आजसारखी चर्चा पुन्हा होणार नाही व त्या आंदोलनात विपरीत काही घडल्यास त्यास संपूर्ण जबाबदार डी. मार्ट व्यवस्थापनच राहील, अशी तंबीही निकम यांनी डी मार्टला दिली. या प्रकरणी डी मार्ट मॉलचे व्यवस्थापक यांना संपर्क साधून विचारले असता त्यांनी लोकमत ऐकताच मोबाईल बंद केला.
शिवसेनेचा इशारा
वसईतील ग्राहकाने आमच्या सेनेच्या स्टेला विभाग प्रमुखांकडे पुराव्या सहित तक्रार दिली आहे. ही बाब आरोग्यासाठी खूप हानिकारक आहे त्यामुळे केवळ डी मार्ट ने वस्तू बदलून प्रश्न सुटणार नाही तर ज्या 'किंजल'कंपनी कडून हा गूळ पेकिंग होऊन आला आहे व त्यात मेलेली पाल आढळून आली आहे. त्यामुळे डी मार्ट व गूळ कंपनी हे दोघेही तितकेच यांस जबाबदार आहेत. तरी ग्राहकांना डी मार्ट ने गृहित धरू नये यांना अद्दल घडलीच पाहिजे. कारभार सुधारा, गूळ कंपनीवर कारवाई करा अन्यथा शिवसेना आपल्या स्टाईलने आंदोलन करेल.
किरण उदय चेंदवणकरमाजी नगरसेविका, शिवसेना तथा महिला जिल्हा संघटक,वसई