वसई : विरार पूर्वेला पाचपायरी जीवदानी मंदिर परिसरात असलेल्या दगड खाणीत साचलेल्या पाण्यात सध्या स्टंटबाज तरुणांनी धांगडधिंगा घातलाय. ही मुलं उंच कड्यावरून पाण्यात उडी घेऊन धोकादायक स्टंट करून मृत्यूला आमंत्रणच देत आहेत.या खाणीच्या पाण्यात दरवर्षी अनेक तरुणांचा बुडून मृत्यू झाला असल्याने प्रशासनाने हे स्टंट गांभिर्याने घेऊन येथील प्रवेश बंद करावा, अशी मागणी जोर धरत आहे.
जीवदानी मंदिर परिसरात पाचपायरी येथे ही दगडखाण असून मागील अनेक वर्षांपासून ती बंद आहे. खाणीत मोठा खड्डा असल्याने दरवर्षी पावसाळ्यात त्यात पाणी साचते. परिणामी परिसरातील मुले पोहण्याचा आनंद घेण्यासाठी या पाण्यात उतरून धोकादायक स्टंट करत आहेत. उंचावरून पाण्यात उड्या घेणे, एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत शर्यत लावणे, पाण्यातच मस्ती करणे असे स्टंटचे धोकादायक प्रकार येथे मुले करीत असल्याने हे स्टंट मुलांच्या जीवावर बेतण्याचा धोका निर्माण झाला आहे. शिवाय मुलांच्या हुल्लडपणाला लगाम घालण्यासाठी येथे कोणाचा वावर नसल्याने मुलांना स्टंट करण्यासाठी रान मोकळे मिळाले आहे.
पावसाळ्यात या खदाणीत पाणी साचल्यावर परिसरातील तरु ण येथे स्टंट करतात हे स्टंट अनेकांच्या जीवावरही बेतले आहेत. शिवाय पोलिसांची गस्त नसल्याने रात्रीच्या अंधारात येथे प्रेम युगुलांचाही वावर वाढला आहे. या स्टंटबाज तरुणांना लगाम घालण्यासाठी पोलीस प्रशासनाने किंवा महापालिकेने पुढाकार घेण्याची गरज आहे.