- शौकत शेख, डहाणू
दलालांकडून शेतमालाला रास्त भाव मिळत नसल्याने २०० शेतकऱ्यांनी बाडापोखरण वासगाव येथे सभा घेऊन दलालांना माल न देण्याचा निर्णय घेतला. डहाणूच्या बंदरपट्टी भागातील शेतकरी भाजीपाला उत्पादनाकडे वळला आहे. डहाणूतील वरोर, वाढवण, बाडापोखरण, तिडयाळे, ऐना, रणकोळ, कासा, सायवन, वानगाव, खंबाळे, आसनगाव, चंडीगाव, धूमकेत, अभ्राण, बावडा वाणगाव, कोलवली आदी भागातील शेतकरी भोपळा, भेंडी, मिरची, वांगी, कोथिंबीर, दुधी आदीचे उत्पादन घेतात. मात्र त्याला रास्त भाव मिळत नसून दलालांकडून मोठ्या प्रमाणात पिळवणूक होते आहे. मिरचिला मुंबईला २८ रु पये प्रतिकिलो भाव मिळत असतांना दलाल मात्र शेतकऱ्यांकडून ती केवळ १८ रुपये किलोने खरेदी करीत आहेत. त्यामुळे शुक्रवारी शेतकऱ्यांत संतप्त प्रतिक्रीया उमटल्या. त्यामुळे दलालांकडून जोपर्यंत शेतमालाला रास्त भाव मिळत नाही तोपर्यंत त्यांना माल विकायचा नाही असे शेतकऱ्यांनी ठरविले आहे. डहाणू तालुक्यातील जंगलपट्टी तसेच बंदरपट्टी भागातील शेतकऱ्यांचे भात हे मुख्य पिक असून पावसाच्या लहरीपणामुळे गेली काही वर्षे भातपिक घेण्यात शेतकऱ्यांना अनेक अडचणी येत आहेत. तसेच त्याला तालुक्याबाहेर विशेष भावही मिळत नसल्याने खर्च झालेले पैसेही वसूल होत नाही. त्यामुळे शेतकरी भाजीपाला लागवडीकडे वळाला आहे. हा भाजीपाला दलाल डहाणू, बोईसर, चिंचणी यांसारख्या बागायतीतून मातीमोल दराने खरेदी करु न तो जास्त किमतींना बाजारात विकत आहेत. शेतकऱ्यांच्या या निर्णयामुळे डहाणूच्या दुर्गम भागातील शेकडो गावातील हजारो लोकांना मिरची खुडणे, गोण्या भरणे त्या ट्रकमध्ये चढविणे इत्यादि रोजगार मिळतो. तो आता बंद होण्याची शक्यता आहे.