डहाणू : वादग्रस्त वाढवण बंदराचा फैसला उद्या होण्याची शक्यता आहे. या बंदरासंबधी चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १९ आॅगस्ट रोजी मुंबईच्या सह्याद्री अतिथी गृहावर बैठक बोलविली आहे. या बैठकीला वाढवण बंदर विरोधी संघर्ष समिती, महाराष्ट्र मच्छिमार कृती समिती आणि बंदराशी संबधित असलेले जिल्ह्याचे पालकमंत्री विष्णु सावरा, आ. कपिल पाटील, आ. आनंद ठाकुर, आ. अमित घोडा, आ. पास्कल धनारे यांना चर्चेसाठी बोलाविले आहे.या पूर्वी वाढवण बंदरा संदर्भात जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष अनिल डिग्गीकर यांच्या समवेत संघर्ष समितीची बैठक झाली आहे. या बैठकीत स्थानिकांना नोकऱ्या मिळतील, देशाचा विकास होईल, एक ही गाव किंवा घर विस्थापित केले जाणार नाहीत तसेच सर्व कायद्याचे पालन केल्याप्रकरणी शक्य असेल तरच बंदर उभारणीचा निर्णय घेतला जाईल अशी भूमिका अनिल डिग्गीकर यांनी मांडली होती. तर परंपरागत लाखो मच्छीमारांचा रोजगार बुडून ते उद्ध्वस्त होतील, येथील तरुणांना डाय मेकिंगच्या रूपाने रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत. शिवाय येथील शेती पारंपरिक पध्दतीने केली जात असून शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारे वाढवण बंदर आम्हाला नकोच आहे अशी भूमिका संघर्ष समितीने मांडली होती. (वार्ताहर)मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेकडे साऱ्यांचे लक्षआता मुख्यमंत्र्यांसमवेत ही उच्चस्तरीय बैठक उद्या (१९ आॅगस्ट) सह्याद्री अतिथि गृहावर होणार आहे. निवडणूक प्रचारा दरम्यान मुख्यमंत्र्यानी स्थानिकांना विश्वासात घेतल्याखेरीज वाढवण बंदर करणार नाही अशी भूमिका घेतली होती. त्याच प्रमाणे शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांनीही त्यावेळी हीच भूमिका घेतली होती. या पार्श्वभूमीवर उद्या होणाऱ्या संघर्ष समितीच्या बैठकीत मुख्यमंत्री कोणती भूमिका घेतात याकडे येथील सर्व जनतेचे लक्ष लागून राहिले आहे.
वाढवण बंदराचा आज फैसला
By admin | Published: August 19, 2016 2:02 AM