भार्इंदर: मीरा रोड येथील सुमारे चार ते पाच एकर जागा येथील एका आदिवासी कुटुंबाने १९९१ मध्ये नगरपालिकेला स्मशानभूमी व जॉगर्स पार्कच्या आरक्षणानुसार विनामोबदला दिली. या जागेची कागदोपत्री मालकी अद्यापही बाबर यांच्या नावे असल्याने जॉगर्स पार्कला मीरा-भार्इंदर महापालिकेने शहीद मेजर कौस्तुभ राणे यांचे नाव देण्याचा निर्णय घेतला. पालिकेचा निर्णय एकतर्फी असल्याचा दावा करीत जागा मालकाने पालिकेला नुकतीच कायदेशीर नोटीस बजावली आहे.
मौजे पेणकरपाडा येथील जागा लक्ष्मण बाबर यांनी पालिकेला १९९१ मध्ये विनामोबदला दिली. ही जागा पालिकेने १९९७ व २००० मधील शहर विकास योजनेतील आरक्षणाप्रमाणे स्मशानभूमी व जॉगर्स पार्कच्या विकासासाठी मिळविली. मात्र त्यासाठी जागा मालकाने या जागेवर विकसित होणाऱ्या स्मशानभूमीला आपल्या आजोबांच्या नावे ‘नवशा रूपा बाबर मुक्तीधाम’ असे नाव देण्याची मागणी जागा मालकाने प्रशासनाकडे केली. त्यानुसार प्रशासनाने लक्ष्मण यांना पत्रव्यवहार करून त्यांची मागणी तत्वत: मान्य केल्याचे कळविले. तसेच ती जागा नगरपालिकेच्या ताब्यात देण्याची कार्यवाही करण्याबाबतची सूचना त्यांना दिली. ही जागा नगरपालिकेच्या ताब्यात दिल्यानंतर प्रशासनाने त्याचा टीडीआर परस्पर विकासकांच्या घशात घालून त्यावर स्मशानभूमी व जॉगर्स पार्कचा विकास केला. त्याची कोणतीही माहिती जागा मालकाला देण्यात आलेली नाही. तसेच त्यांच्या मागणीला आजतागायत केराची टोपली दाखवली. स्मशानभूमी व जॉगर्स पार्कचा टीडीआर घोटाळा करणाºया प्रशासनाने जागा ताब्यात घेताना तिच्या कागदपत्रांवर नगरपालिकेचे नाव टाकण्याची तसदीच घेतली नाही. परिणामी आजही ती जागा मूळ मालकाच्याच नावे असल्याची नोंद सातबाºयात आहे. त्यामुळे अद्यापही ती जागा खासगीच असल्याचा दावा जागा मालकाने केला आहे.
या जॉगर्स पार्कला दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले मेजर कौस्तुभ राणे यांचे नाव देण्याचा निर्णय महासभेत घेण्यात आला. त्याची माहिती जागा मालकाचे वारसदार व जागेचे सध्याचे मालक हरिश्चंद्र बाबर यांना मिळताच त्यांनी निर्णयावर नाराजी व्यक्त करत त्या जागेची मालकी आपल्याकडे असल्याची आठवण पालिकेला करून दिली. तशी नोटीसच पालिकेला पाठवली असून त्यात त्यांनी राणे यांच्या नावाला आपला कोणताही आक्षेप नसल्याचेही स्पष्ट केले आहे. जागा खासगी असल्याने त्यावरील सर्व निर्णय पालिकेने एकतर्फी न घेता त्याबाबत जागा मालकालाही विचारात घेणे अपेक्षित असल्याचे मत व्यक्त केले आहे. दरम्यान, २०१६ मध्ये हरिश्चंद्र यांनी स्मशानभूमीकडे जाणाºया रस्त्यालाही आजोबा नवशा यांचे नाव देण्याची मागणी पालिकेकडे केली होती. परंतु, कार्यवाही केली नाही.ही जागा पालिकेच्या ताब्यात असल्याने त्याच्या नामकरणाचा निर्णय महासभेने घेतला आहे.- दीपक खांबित, कार्यकारी अभियंता