डहाणू/बोर्डी : फटाकेमुक्त दिवाळी आणि त्याला किल्ले उभारणीची जोड देऊन पर्यावरण तसेच गडकिल्ले संवर्धनाकरिता जनजागृती मोहीम जिल्हा परिषदेच्या शंकरपाडा शाळेने राबविला. हा प्रकल्प नव्हे तर उत्सवाच्या माध्यमातून पर्यावरणपूरक संकल्प असल्याची माहिती विद्यार्थ्यांनी दिली.
सध्या या उत्सवात हौसेकरिता फटाके न फोडता, यामाध्यमातून आर्थिक सधनतेचे प्रदर्शन आणि चंगळवाद फोफावत आहे. त्यामुळेच फटाकेमुक्त दिवाळी आणि शिववैभव किल्ले संवर्धनाचा संकल्प विद्यार्थी व शिक्षकांनी राबवला. त्यानुसार फटाक्यांना फाटा देत, ‘नको फटाक्यांचा अपघात किल्ले बांधू अंगणात’ ही संकल्पना घेऊन छत्रपती शिवरायांचे गडकिल्ले यांचे संवर्धन करणे काळची गरज आहे हा संदेश पोहचवण्यासाठी पर्यावरणस्नेही दिवाळी साजरी करण्याकसाठी जनजागृती मोहीम शाळेने हाती घेतली आहे.
शिवरायांच्या जाज्वल्य इतिहासाची साक्ष देणारे सुंदर गडकिल्ले उभारायचे अशी संकल्पना शिक्षक विजय वाघमारे यांनी विद्यार्थ्यांसमोर मांडली. विद्यार्थ्यांचाही या उपक्र माला प्रतिसाद देत परिसरातील माती, चिखल, शेण, दगड गोटे जमवून विविध किल्यांच्या प्रतिकृती उभारण्यास चालना मिळत आहे. किल्ल्यांचा पायाभरण ,तटबंदी, मोठे बुरूज, छोटे बुरूज, माची, मुख्य दरवाजा, चोर दरवाजा, चोरवाटा, भुयार, दरबार, धान्यांचे कोठारे, इत्यादी त्यावेळच्या वास्तूशिल्पाची माहिती विद्यार्थी आत्मसात करून संकल्पनेतून उतरवत आहेत.
गडकिल्यांना वाढत्या प्रदूषणाचा विळखा, त्यांची होणारी पडझड रोखण्यासाठी तसेच शिवकालीन ऐतिहासिक ठेवा , प्राचीन संस्कृती सवंर्धनासाठी व पर्यावरणस्नेही दिवाळी कार्यशाळा झाली. टाकाऊ वस्तूंचा वापर करून आकाशकंदील तयार केले. मुख्याध्यापक राजेंद्र आहिरे, शिक्षक जयवंत सावळा, लहू होळगीर, प्रतिमा वरठा यांनी मार्गदर्शन केले.