कासा : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत डहाणू तालुक्यात डेडिकेटेड पाॅझिटिव्ह कोरोना रुग्णालय अभावी २० कोरोना संक्रमित मातांची प्रसूती करावी लागली आहे. कोरोना संक्रमित मातांना प्रसूतीसाठी नायर हाॅस्पिटल येथे पाठवण्यात येते, मात्र ग्रामीण भागातील महिला मुंबई येथे जाण्यास तयार होत नाहीत. परिणामी डहाणू तालुक्यात समर्पित प्रसूती कोरोना केंद्र सुरू करण्याची मागणी होत आहे. खासदार राजेंद्र गावित यांनी डहाणू येथे आरोग्य अधिकारी डाॅ. अभिजीत चव्हाण यांच्याशी चर्चा केल्यानंतर याबाबत आपण आरोग्य संचालनालयाशी बोलून तत्काळ यावर निर्णय घेण्याच्या सूचना करणार असल्याचे सांगितले.डहाणू तालुक्यात जानेवारी २०२१ पासून ६७७ मातांची यशस्वी प्रसूती करण्यात आली. दरम्यान, काही मातांचे कोरोना चाचणी अहवाल पाॅझिटिव्ह येतात. अशा काेरोना संक्रमित महिलांना प्रसूतीसाठी नायर रुग्णालयात पाठवण्यात येते, मात्र ग्रामीण भागातील महिला मुंबईला जाण्यास तयार नसतात. लहान मुले तसेच आरोग्याची काळजी घेण्यासाठी घरातील सदस्यांना परवानगी नसल्याने ग्रामीण महिला मुंबईसारख्या ठिकाणी चांगले उपचार मिळत असतानाही प्रसूतीसाठी जाण्यास तयार होत नाहीत, असे दिसून आले आहे. परिणामी डहाणू तालुक्यामध्ये समर्पित प्रसूती केंद्र नसल्याने कोरोना संक्रमित मातांची प्रसूती वैद्यकीय अधिकाऱ्यांना करावी लागत आहे. डहाणूत एकूण २२ कोरोना संक्रमित मातांची प्रसूती करण्यात आली आहे. त्यामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांना जोखीम पत्करून काम करावे लागत आहे. डहाणूत समर्पित प्रसूती कोरोना रुग्णालय सेंटरची मागणी होत आहे.
डहाणूत आयसीयू बेड वाढवण्याबरोबरच कोरोना लसीकरणात सुसूत्रता आणण्यासाठी आरोग्य मंत्र्यांकडे पाठपुरावा केला आहे. डहाणूत आयसीयू केंद्रासाठी ४ एमबीबीस, ४ बीएएमएस, १३ नर्सेसचा स्टाफ वाढवण्याची मागणी केली आहे. मुंबईच्या तुलनेत पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील डाॅक्टरांच्या पगारवाढीबाबत आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे मागणी केली आहे. - राजेंद्र गावित, खासदार, पालघर