आशिष राणे
वसई - कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्य शासनाने दि १५ एप्रिल रोजी घोषित केलेल्या लॉक डाऊनच्या नियमावलीत केवळ अत्यावश्यक सेवेतील अधिकारी कर्मचाऱ्यांना रेल्वे प्रवासाची मुभा दिली आहे मात्र हा सपशेल दुजाभाव असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया आता पालघर वसई सहित मुंबई उपनगरातुन देखील उमटू लागल्या आहेत. त्यामुळे आता आम्हाला ही रेल्वे ची सुविधा मिळावी या मागणी साठी पालघर जिल्ह्यासहित मुंबई उपनगरातील सर्वच खाजगी आणि सहकारी बँक कर्मचाऱ्यांची रेल्वे प्रवासासाठी परवानगी देण्याची एकमुखी मागणी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे सोशल मीडिया व इ मेल द्वारे केली आहे.
दरम्यान बँकेच्या मार्फत आर्थिक व्यवहार सुरळीत चालू राहावे,यासाठी बँका अत्यावश्यक सेवेत समाविष्ट आहेत मात्र त्यांचे अधिकारी कर्मचारी हे मात्र सरकारने वाऱ्यावर सोडून दिले असून या सर्वांना रेल्वेने प्रवास करणे खूपच अडचणीचे होत आहे त्यामुळे या सर्वांना महामार्ग व सार्वजनिक वाहतुकीने दररोज 300 ते 500 आणि प्रसंगी हजार बाराशे रुपये भाडे देत पदरमोड करून कामाच्या स्थळी पोहचावे लागते.
किंबहुना शासनाने अत्यावश्यक सेवेत बॅंकेला आणलं आहे मग खाजगी आणि सहकारी बँकांचे कर्मचारी अधिकारी हे त्याचं बँकेचा भाग येत असूनही त्यांना लोकल ने रेल्वे प्रवास नाकारला जात असल्याने मोठ्या अडचणी निर्माण होऊ लागल्या आहेत. त्यामुळे या बँक अधिकारी व कर्मचाऱ्याना वेळेस बँकेत जाण्यासाठी मोठी फरपट होत आहे त्यात वेळ व पैसे ही वाया जात आहेत. शासनाकडूनच असा दुजाभाव केला जात असल्याचा गंभीर आरोप आता या बँक अधिकारी कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत असून सरकारच्या या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांनी तीव्र संताप लोकमत शी बोलताना व्यक्त केला आहे.
पालघर जिल्हा किंवा वसई विरार आणि पुढे मुंबई उपनगर या ठिकाणच्या भागातून अनेक बँक कर्मचारी अधिकारी हे पालघर वसई विरार व मुंबई त किंवा उपनगरात ठीक ठिकाणच्या बँक शाखेत काम करीत आहेत. विशेष म्हणजे हे सर्वच बँक कर्मचारी अधिकारी हे या अगोदरच्या लॉकडाऊन वेळी ओळखपत्र दाखवून रेल्वे लोकलने प्रवास करीत होते. परंतु आता कोरोना च्या वाढत्या संक्रमणामुळे लोकलने केवळ अत्यावश्यक व शासकीय कर्मचाऱ्यांनाच प्रवास करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे बँकेचे कामकाज जरी अत्यावश्यक सेवेत येत असले तरी खाजगी व सहकारी बँकेत काम करणाऱ्या अशा असंख्य कर्मचाऱ्यांचा रेल्वे लोकलने प्रवास करण्याचा समावेश करण्यात आलेला नाही आणि म्हणून रेल्वे पोलीस या सर्वांना प्रतिबंध करतात. त्यामुळे लागलीच किंवा निदान 1 मे नंतर पुढे लॉकडाऊन वाढला तर राष्ट्रीयकृत बँके प्रमाणे खाजगी व सहकारी बँक अधिकारी व कर्मचाऱ्यांना लोकलने प्रवास करता यावा याचा विचार व्हावा अशी मागणी बहुसंख्य त्रस्त बँक कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडे केली आहे.बँकेचा अत्यावश्यक सेवांमध्ये समावेश करायचा आणि बँकेच्या कर्मचारी यांना रेल्वेमध्ये प्रवास करण्यास मुभा द्यायची नाही अत्यंत चुकीचे असे धोरण असल्याचे मत सांताक्रूझ येथील एस को ऑप बँकेचे व्यवस्थापक संदीप तावडे यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केले आहे
सोशल मीडिया व ट्विटर वरून मुख्यमंत्र्यांकडे आग्रही मागणी
यामुळे त्रस्त पालघर जिल्ह्यातील व मुंबई उपनगरातील सर्व खाजगी व सहकारी बँकेचे अधिकारी व कर्मचारी आता शासनाला व मुख्यमंत्र्यांना सोशल मीडिया व ट्विटरवर ट्विट करून ई-मेल करून आपला संताप व्यक्त करणार आहेत. रेल्वे पोलीस अडवतात त्यामुळे आता खासगी वाहन किंवा सार्वजनिक वाहतुक जे मिळेल त्या वाहनाने बँक गाठावी लागते. लोकलमध्ये प्रवासाला मुभा दिली तर आम्ही बँकेत वेळेस पोचू व पैसे ही वाचतील
मी वसई हुन मुंबईत जातो माझा मोठ्या प्रमाणात वेळ व पैसा दोन्ही खर्च होत असून मोठा मनस्ताप देखील सहन करावा लागतो - सतीश पाटील, वसई, खासगी बँक कर्मचारी
मी दादर वरून उपनगरात बँकेत जाते
रेल्वे ने वेळेत पोचता येत होतं मात्र आता रेल्वे पोलीस अडवतात
त्यामुळे दररोज टॅक्सी ने 200 ते 400 रुपये प्रवासासाठी जातात पगारापेक्षा प्रवास खर्च भारी पडतोय
याउलट कधी लेट मार्क ही लागतो
त्यामुळे शासनाने आमच्या बँक कर्मचारी वर्गाची गंभीर दखल घेऊन खाजगी व सहकारी बँकेतील कर्मचार्यांनाही लोकलने प्रवास करण्याची मुभा दयावी अशी मागणी मी महिला बँक कर्मचाऱ्यातर्फे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे करते
मेघा पंडित (दादर)
खाजगी बँक,मुंबई उपनगर