भार्इंदर : मीरा-भार्इंदरमध्ये नगरपालिकेच्या काळात अनेक इमारती नियोजनाअभावी बांधल्या. सध्या त्यांची दुरवस्था झाली आहे. त्यांच्या पुनर्विकासासाठी क्लस्टर विकास योजना लागू करावी, अशी मागणी शिवसेनेच्या गटनेत्या नीलम ढवण यांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.३० ते ३५ वर्षांपूर्वी शहरात अनेक इमारती बांधण्यात आल्या. त्या वेळी शहराचे सुनियोजन करणारा विकास आराखडा अस्तित्वात नसल्याने प्रत्येक इमारतीचे बांधकाम अगदी पाच ते दहा फूट अंतरावर करण्यात आले. त्याचप्रमाणे भार्इंदर पूर्वेकडे ते अधिक असून तेथील एखाद्या इमारतीत आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तेथे बचाव पथकांची वाहनेच पोहोचू शकत नाही. त्यामुळे बचावकार्यात अडथळे निर्माण होतात. मागील काही घटनांच्या वेळी त्यातील अडचणी समोर आल्या आहेत. शिवाय, या इमारतीत अग्निरोधक यंत्रणा नसल्याने तेथे आगीसारख्या घटना घडल्यास तेथे अग्निशमन दल पोहोचणे दुरापास्त ठरते. त्यातच, काही इमारती धोकादायक ठरल्याने त्यांच्या पुनर्विकासाचा प्रस्ताव महापालिकेकडे पाठवला आहे. ज्या इमारतींनी पूर्वी अतिरिक्त चटईक्षेत्र वापरले, त्यांच्या पुनर्विकासाचा मार्ग खडतर झाल्याने त्या पाडलेल्या अवस्थेतच आहेत. यामुळे त्यातील रहिवासी इमारतींच्या पुनर्विकासाच्या प्रतीक्षेत आहेत. काहींना पुनर्विकासाची परवानगी दिली जात असल्याने पुन्हा पूर्वीचीच परिस्थिती कायम राहते. पुनर्विकासाच्या वेळी इमारतीच्या चारही बाजूंना मोकळी जागा ठेवणे अपेक्षित असते, जेणेकरून आपत्कालीन परिस्थितीत तेथे वाहने पोहोचून बचावकार्य सहज होऊ शकेल. परंतु, काही विकासक पालिकेची दिशाभूल करून त्या इमारतीच्या पुनर्विकासाला परवानगी मिळवून दाटीवाटीची परिस्थिती जैसे थे राहते. काही धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासाचे प्रस्ताव प्रशासनाकडे प्रलंबित असून त्यावर राज्य सरकारकडून वाढीव चटईक्षेत्र निर्देशांक मंजुरीच्या प्रतीक्षेत प्रशासन आहे. याऐवजी सलग असलेल्या इमारतींसाठी पुनर्विकासाकरिता क्लस्टर विकास योजना लागू करावी. सध्या शहराचा सुधारित विकास प्रारूप आराखडा पूर्ण करण्याचे काम सुरू असल्याने शहराच्या सुनियोजनासाठी क्लस्टर विकास योजना लागू करावी, अशी मागणी ढवण यांनी केली आहे. त्यावर, पालकमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत त्याची चाचपणी करण्यात येईल, असे आश्वासन दिल्याचे ढवण यांनी सांगितले.
मीरा-भार्इंदरमध्ये क्लस्टर लागू करण्याची मागणी
By admin | Published: August 30, 2016 2:15 AM