लोकमत न्यूज नेटवर्क
मीरारोड - सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना पालिकेने झटपट परवानगी देण्यासाठी एक खिडकी योजना सुरू करून कोणत्याही प्रकारचे परवाना शुल्क पालिकेने घेऊ नये. मंडळांच्या कार्यकर्त्यांसाठी कोरोना प्रतिबंधक लस शिबिराचे आयोजन करण्याची मागणी आमदार प्रताप सरनाईक यांनी महापालिका आयुक्त दिलीप ढोले यांना केली आहे.
आ. सरनाईक यांनी मीरा भाईंदर महापालिका आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,कोरोना काळात सर्वच श्री गणेशोत्सव मंडळांनी आपापल्या परीने रुग्णसेवा व जनतेची सेवा केली आहे. अन्न दान, रक्तदान, प्लाज्मा दान ,ऑक्सिजन मिळवून देणे , रुग्णवाहिका मिळवून देण्यापासून सर्व सामान्य नागरिकांना लागेल ती मदत करण्यासाठी गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते कोविड योद्धे म्हणून कोरोना काळात पुढे राहिले आहेत.
महापालिकेने श्री गणेशोत्सव मंडळांची यादी मागवून घेऊन त्यानुसार मंडळांच्या कार्यकर्त्यांना लस देण्यासाठी विभागवार विशेष लसीकरण सत्र आयोजित करावे. त्याचबरोबर गणेशोत्सव मंडळे व काही सामाजिक संस्थांना सोबत घेऊन अशा सेवाभावी कार्यकर्त्यांच्या लसीकरणासाठी आपण सुद्धा महापालिकेला आवश्यक ते सर्व सहकार्य करण्यासाठी तयार आहोत. मंडळांच्या कार्यकर्त्यांचे लसीकरण करण्यासाठी तात्काळ प्रशासनाला सूचना द्याव्यात अशी विनंती सरनाईक यांनी केली आहे.
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे , पोलीस प्रशासन व लोकप्रतिनिधी यांची उत्सवाच्या पार्श्वभूमीवर एक बैठकही लवकरच आयुक्त या नात्याने आयोजित करावी असे सरनाईक यांनी पत्रात म्हटले आहे