लोकमत न्यूज नेटवर्कवाडा : विविध मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी कम्युनिस्ट पक्षाने सोमवारी वाडा प्रांत कार्यालयावर मोर्चा काढला. त्याचे नेतृत्व सुनील धानवा यांनी केले. त्यामुळे वाहतुकीचा खोळंबा झाला होता.खंडेश्वरी नाक्यावरून निघालेला मोर्चा संपूर्ण शहरातून काढून त्याचे प्रांत कार्यालयाजवळ सभेत रूपांतर झाले. यावेळी कोण म्हणतो देणार नाय ; घेतल्या शिवाय राहणार नाय, शिक्षण आमच्या हक्काचे; नाही कुणाच्या बापाचे, चले जाव चले जाव; मोदी सरकार चले जाव. अशा घोषणा देण्यात आल्या. वनाधिकार कायद्याची अंमलबजावणी करून वनपट्टे कसणा-यांना द्या, भरमसाठ वीज बिलाची आकारणी बंद करून जनतेची पिळवणूक थांबवा, गॅस बाधित शेतकऱ्यांना योग्य नुकसान भरपाई द्या, कुडूस नाक्यावरील अनिधकृत टपऱ्या हटवा व खदानी तसेच धर्मशाळेवरील अतिक्रमणे ताबडतोब दूर करा, सापने ग्रामस्थांच्या मागण्यांची पूर्तता करा, रोजगार हमी योजनेतून कामे देऊन रोज ३०० रूपये मजुरी द्या, वाडा ग्रामपंचायतीतील मोहोड्यांचा पाडा येथे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करा, वाडा शहरात शौचालये व स्वच्छतागृहांची व्यवस्था करा, कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना बी बियाणे, खते व औषधे देण्याची व्यवस्था करा, कारखान्यात ८० टक्के स्थानिकांना प्राधान्य द्या, वाडा शासकीय रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा द्या आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. त्याचे निवेदन प्रांत अधिका-यांना देण्यात आले. यावेळी कम्युनिस्ट पक्षाचे नेते बारक्या मांगात, चंदू धांगडा, जगन म्हसे, लक्ष्मण काकड, दामोदर बात्रा आदी उपस्थित होते. यावेळी कम्युनिस्ट पक्षाचे नेते प्रकाश चौधरी, रमा तारवी, अनिल पाटील, सुरेश दयात, दिनेश सांबरे, मारवत मोरघा आदी उपस्थित होते.
मागण्यांसाठी कम्युनिस्टांचावाडा प्रांत कार्यालयावर मोर्चा
By admin | Published: May 30, 2017 5:14 AM