n हितेन नाईकलोकमत न्यूज नेटवर्कपालघर : आपला पारंपरिक मासेमारी व्यवसाय, मासेविक्री, कडकडीत बंद ठेवून डहाणू ते मुंबईतील कफपरेड दरम्यानच्या मच्छीमारांच्या गावांनी आपल्यातील एकजुटीचे मंगळवारी दर्शन घडविले. आम्हाला उद्ध्वस्त करणारे बंदर नको. स्थानिकांच्या भावनांचा विचार न करता, केंद्र आणि राज्य सरकार जबरदस्ती करत असेल, तर संपूर्ण किनारपट्टी एकत्र येत वाढवणमध्ये एल्गार पुकारेल, असा इशारा या बंदमधून देण्यात आला. पालघर जिल्ह्यासह मुंबईच्या कफपरेडदरम्यानच्या सुमारे आठ ते दहा हजार बोटींनी मासेमारीला न जाता, एक दिवसाच्या उत्पन्नावर पाणी सोडले, तर सर्व सहकारी संस्थांनी मासे खरेदी, बर्फ उत्पादन, साहित्य, डिझेलची विक्री, दुकाने, रिक्षा आदी सर्व व्यवहार बंद ठेवून, आम्ही सरकारला इशारा दिल्याचे नॅशनल फिश वर्कर्स फोरमचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी सांगितले.वाढवण बंदराच्या विरोधाचा वणवा आता पालघर, मुंबईतल्या कोळीवाड्यांमध्ये पसरला असून, मानवी साखळी, मासेमारी बंद, मासेविक्री बंदसह आपापल्या भागातील सर्व बाजारपेठा बंद ठेवून वाढवण बंदराच्या विरोधातील आपला संताप व्यक्त करण्यात आला. मासेमारी व्यतिरिक्त मच्छीमारांपुढे उदरनिर्वाहाचे अन्य कुठलेही साधन नसल्याने वाढवण बंदरामुळे मासेमारीचा व्यवसाय देशाेधडीला लागणार आहे. अपघाताचे प्रमाण, प्रदूषण वाढून मत्स्यसंपदा नष्ट होत किनाऱ्यावरील घरांनाही धोका पोहाेचणार असल्याचे मच्छीमारांतून प्रचंड रोष व्यक्त केला जात आहे. वाढवणसह परिसरातील तिघरे पाडा, वरोर, डहाणू आदी चार-पाच गावांतील नागरिकांनी पुन्हा सुरू केलेल्या वाढवण बंदराच्या सर्वेक्षणासह अन्य गोष्टींना विरोध दर्शविला होता. पोलिसांचा फौजफाटा वाढवणमध्ये तैनात करून हा विरोध मोडण्याचे काम केंद्र, राज्य सरकार करू लागले होते.‘आपण हाक द्या, आम्ही हजर राहू’वाढवण बंदर विरोधी संघर्ष समितीने उभारलेल्या लढ्याला ताकद देण्याचे काम आजच्या किनारपट्टीवरील गावांनी केले. सर्व हेवेदावे विसरून कुठल्याही दबावापुढे झुकू नका, आम्ही आपल्यासोबत आहोत, असा मेसेज आम्ही आजच्या बंदमधून देऊन, ‘आपण हाक द्या, आम्ही हजर राहू’ असा विश्वास वाढवण बंदराच्या विरोधात लढणाऱ्या बांधवांना दिल्याचे कळंबचे धीरज निजाई यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
वाढवण बंदराविरोधात घडले एकजुटीचे दर्शन
By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2020 12:27 AM