भाववाढीविरोधात वसईत निदर्शने; कांदा दरवाढीमुळे जनतेत तीव्र असंतोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2019 11:53 PM2019-12-13T23:53:04+5:302019-12-13T23:53:37+5:30

सर्वसामान्यांचे महिन्याचे बजेट कोलमडले

Demonstrations against inflation; Massive dissatisfaction among the population due to onion prices | भाववाढीविरोधात वसईत निदर्शने; कांदा दरवाढीमुळे जनतेत तीव्र असंतोष

भाववाढीविरोधात वसईत निदर्शने; कांदा दरवाढीमुळे जनतेत तीव्र असंतोष

Next

वसई : कांद्याच्या भावाने शंभरी पार केल्याने आता सर्वसामान्यांच्या आहारातूनच कांदा गायब झाला आहे. कांद्यासह अनेक जीवनावश्यक वस्तूंचे भाव दुपटीने वाढल्याने सर्वसामान्यांचे महिन्याचे बजेटच कोलमडले आहे. या दरवाढीमुळे लोकांमध्ये तीव्र असंतोष असून जनतेचा आवाज केंद्र सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी वसई-विरार शहर जिल्हा काँग्रेसतर्फेवसई रोड पश्चिम येथे अंबाडी रोडवर निषेध आंदोलन करण्यात आले.

सध्या दिवसेंदिवस कांद्याच्या भावामध्ये वाढ होत असल्यामुळे जनतेमध्ये प्रचंड असंतोष पसरला आहे. एकूणच या कांदा भाववाढीविरोधात वसई-विरार जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष ओनील अल्मेडा यांच्या नेतृत्वाखाली नुकतेच वसईच्या अंबाडी रोड येथे जिल्हा काँग्रेस कार्यकर्त्यांनी घोषणा देत आंदोलन केले. या वेळी कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारविरोधी घोषणाही दिल्या.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या चुकीच्या धोरणांमुळे महागाई वाढली आहे. कांदा भाववाढीबरोबरच इतर जीवनावश्यक वस्तूंचे भावसुद्धा गगनाला भिडले आहेत.  ओनिल अल्मेडा यांनी सांगितले की, भाज्या, कडधान्ये यांच्यासह अनेक जीवनावश्यक वस्तूंचे भाव गगनाला भिडले आहेत. अशाच प्रकारे भाववाढ होत राहिली, तर देशामध्ये प्रचंड असंतोष पसरून जनता रस्त्यावर येईल आणि त्यावर नियंत्रण आणणे केंद्र व राज्य प्रशासनाला कठीण होऊन बसेल. म्हणूनच केंद्र सरकारने या भाववाढीसंदर्भात नियंत्रण ठेवून सर्वसामान्य जनतेला दिलासा देणे आवश्यक असल्याचे मत अल्मेडा यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.

नागरिकत्व दुरुस्तीविरोधातही आंदोलन याबरोबरच जिल्हा काँग्रेसने वादग्रस्त नागरिकत्व विधेयकालाही विरोध दर्शवला आहे. या दुरुस्ती विधेयकाला देशभरातून विरोध होत असताना आसाम राज्यासहीत ईशान्य भारतामध्ये हिंसक आंदोलन होत आहेत. या विधेयकाविरोधात सुद्धा वसईत निदर्शने करण्यात आली.

दरम्यान, सरकारच्या चुकीच्या धोरणांविरोधात शनिवारी, १४ डिसेंबर रोजी काँग्रेसतर्फे दिल्ली येथील रामलीला मैदानावर ‘भारत बचाव आंदोलन’ छेडण्यात येणार आहे. या आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी वसई-विरार जिल्ह्यांमधून बहुसंख्य काँग्रेस कार्यकर्ते रवाना झाले आहेत, असेही अल्मेडा यांनी सांगितले.

Web Title: Demonstrations against inflation; Massive dissatisfaction among the population due to onion prices

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.