पालघर : मागील दहा वर्षांपासून उपनगरीय प्रवाशांना अविरत सेवा देणारी बोईसर-दिवा डीएमयू गाडी सर्वांपासून बंद करण्यात येत असून प्रवाश्यांना आनंददायी व सुखरूप सेवा देणाऱ्या या गाडीला प्रवाशांनी माठ्या जड अंत:करणाने निरोप दिला. या गाडी ऐवजी आता मेमु गाडी धावणार आहे.
२००८ पासून सेवा देत असलेली बोइसर दिवा डीएमयू ७१००१ च्या जागी सोमवारपासून मेमू गाडी धावणार आहे. सलग १० वर्षे बोईसर ते दिवा या दरम्यान प्रवाशांना आरामदायी आणि सुखरूप आपल्या वेळेवर पोहचवणाऱ्या लाल परी उद्या आपल्यातून विलुप्त होणार आहे. इतके वर्ष चांगली सेवा देणारी ही परी आपल्या स्मरणात सदैव राहावी म्हणून आज डहाणू वैतरणा प्रवासी सेवाभावी संस्थे तर्फेबोइसर ते वैतरणापर्यंत विविध स्थानकात हार, फुलांनी सजवून गुच्छ देवून शेवटचा निरोप देण्यात आला.
तत्कालीन खासदार दामू शिंगडा यांच्या शुभहस्ते २००८ मध्ये शुभारंभ करण्यात आलेली ही सेवा डिझेल मल्टिपल युनिट (डीएमयू) चा रेक वापरुन सुरु होती. सुरुवातीला मध्ये इंजिन असलेली आणि दोन्ही बाजूला चार चार डब्बे असलेली गाडी धावत असे.
१२ आँक्टोबर २०१८ रोजी मध्य रेल्वे च्या कोचिंग डिपार्टमेंटने काढलेल्या नोटिफीकेशन प्रमाणे १५ आॅक्टोबर २०१८ पासून ही गाडी मेमु (मेनलाईन इलेक्ट्रिकल मिल्टपल युनिट) मध्ये रुपांतरीत करण्यात येणार आहे.