जव्हार : तालुक्यातील दुर्गम भागातील देहरे, कोगदा व पाथर्डी ही गावे मी दत्तक घेत असून येथे विविध योजना पोहोचाव्यात म्हणून व्यक्तिश: लक्ष देणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांच्या पत्नी व प्रसिद्ध गायिका अमृता फडणवीस यांनी दिले. त्या येथील ग्रामीण भागाच्या आढावा दौऱ्यावर आल्या होत्या.प्रथम त्यांनी देहरेगाव व आश्रमशाळेला भेट देऊन तेथील विद्यार्थी व ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेतल्या. तेथून त्या जामसर प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट दिली. तेथे त्यांनी कुपोषित बालकांची विचारपूस करून समस्या जाणून घेतल्या. तेथून त्या जव्हार येथील साईमहल येथील स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण), पालघर जिल्हा परिषद, जव्हार पंचायत समिती आणि दिव्यज फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मासिकपाळी व्यवस्थापन व अस्मिता योजना जनजागृती कार्यशाळेला भेट दिली. त्यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद बोरीकर यांनी योजनेबाबत सविस्तर माहिती दिली. तसेच, जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनीही कुपोषण कमी करून रोजगारवाढीकरिता विविध योजना येथे राबवल्या जात असल्याचे सांगितले.यावेळी उत्कृष्ट अंगणवाडीसेविका म्हणून काम केलेल्या सेविकांना किट व प्रमाणपत्र देऊन व अस्मिता योजनेंतर्गत पुरवठादार म्हणून रजिस्ट्रेशन केलेल्या तालुक्यातील सात बचत गटांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी गेल्या सात महिन्यांपासून बालमृत्यू आणि मातांच्या मृत्यूचे प्रमाण कमी झाले आहे. तसेच, जिल्ह्यातील कातकरी समाजाचे सर्वेक्षण करून त्यांच्यासाठी कातकरी उत्थान कार्यक्रम सुरू केला आहे, असेही जिल्हाधिकारी यांनी सांगितले.
मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी दत्तक घेतली जव्हार तालुक्यातील तीन गावं
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2018 12:43 AM