विरार : जागतिक कोरोना विघ्नाने सगळ्यांच्याच तोंडचे पाणी पळवले आहे. या आजारावरील लस विकसित होणार कधी, जनजीवन सुरळीत होणार कधी, असे एक ना अनेक प्रश्न आ वासून उभे आहेत. यात भर पडली आहे ती शालेय विद्यार्थ्यांची. कोरोनामुळे शाळा सहा महिन्यांपासून बंद आहेत. सहा महिन्यांपासून घरी असलेल्या मुलांना आता वेध लागले आहेत ते शाळेचे. त्यामुळे शाळा कधी सुरू होणार, हा एकच प्रश्न त्या सर्र्वांच्या तोंडी सामावला आहे.मार्च महिन्यात भारतात कोरोनाने शिरकाव केला. तर वसई तालुक्यात एप्रिल महिन्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला. त्यानंतर वसई तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतो आहे.सुरुवातीपासूनच रेडझोनमध्ये असलेल्या वसईतील कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्याचा फटका सामान्य चाकरमानी, रोजंदारीवर काम करणारे मजूर, विद्यार्थी या सगळ्यांनाच बसला आहे.कोरोना आपत्तीमुळे विद्यार्र्थ्यांच्या परीक्षा रद्द करून पुढे ढकलण्यात आल्या असल्या तरी गेल्या सहा महिन्यांपासून बंद असलेल्या शाळांमुळे बच्चे कंपनी हिरमुसली आहे. त्यामुळे शाळा कधी सुरू होणार, हा एकच केविलवाणा प्रश्न ते आपल्या पालकांना विचारत आहेत.दरवर्षी वार्षिक परीक्षा संपल्या की बच्चे कंपनीला वेध लागतात ते उन्हाळी सुट्ट्यांचे. मात्र यंदा उन्हाळी सुट्टी सुरू होण्याआधीच कोरोनाने एन्ट्री घेतल्याने निदान जून महिन्यापर्यंत तरी सर्व बंद राहील, असे अंदाज वर्तविण्यात आले होते.कोरोनामुळे शाळा खूप दिवसांसाठी बंद राहणार म्हणून आनंदी झालेली मुले आता कोरोनामुळे लांबणीवर पडलेल्या शाळा सुरू होण्याच्या प्रतीक्षेत आहेत. घरी बसून कंटाळा आलेली मुले कोरोनामुळे सहा महिन्यांपासून कुठे पाहुणे म्हणून गेलेली नाहीत. आजोळ, मामाचे गाव अशी उन्हाळा सुट्टीत मजा करण्यासाठी ठरलेली गावे कोरोनामुळे या गावांकडे बच्चे कंपनीला जाता आलेले नाही.सिनेमा हॉल, रिसॉर्ट, हॉटेल सर्वच बंद असल्याने सहा महिन्यांपासून गंमतजंमत नावाचा प्रकारच त्यांना अनुभवता आलेला नाही. सध्या मुलांना मिळत असलेल्या आॅनलाइन शिक्षणात राम नसल्याचे पालकांचे गाºहाणे आहे. ग्रामीण भागात नेट स्लो असल्याने मुलांची आॅनलाइन शिक्षणात गैरहजेरी लागत आहे. कोरोनामुळे आनंद हिरावून घेतलेल्या बच्चे कंपनीला आता शाळेची ओढ लागली आहे.
आनंद हिरावून घरातच बसलेल्या बच्चे कंपनीची आता शाळेकडे ओढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 04, 2020 1:28 AM