विरार : पालघर जिल्ह्यात राबवण्यात येणारे समग्र अभियान प्रभावीपणे राबवण्यात येत नसल्याने अपंग, विशेष मुलांना सोयी सुविधांपासून वंचित रहावे लागते आहे. तसेच जिल्ह्यातील केंद्रावर लक्ष ठेवण्यासाठी केवळ पाच शिक्षक कार्यरत असल्याने विद्यार्थ्यांना शिक्षण तसेच सोयीसुविधा मिळत नसल्याचे पालकांचे म्हणणे आहे. त्यामुळे शासनाने या योजनेकडे लक्ष देण्याची गरज आहे.
पालघर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, वसई तालुक्यात एक हजार १५० दिव्यांग आणि विशेष विद्यार्थी आहेत. या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी केवळ पाच शिक्षक नेमण्यात आले आहेत. तर एकट्या वसई तालुक्यात या मुलांचा शोध घेण्यासाठी १३ केंद्रे उभारण्यात आली आहेत.
या १३ केंद्रांतर्गत भाताने २४, बोळींज ४६, दहिसर ३६, कळंब १०४, कमान २२, खानिवडे १४, मालाजीपाडा ५९, माणिकपूर ७७, पारोळ २५, पेल्हार ३२७, वालीव ७४, वसई ५१, विरार १३५ अशा शाळा येतात. या १३ केंद्रातील शाळांवर एका शिक्षकाकडे तीन केंद्रे अशा पद्धतीने हे कामकाज चालते. यामुळे शिक्षकांचा व्याप वाढत असून विद्यार्थ्यांना योग्य प्रकारे शिक्षण आणि योजनांचा लाभ मिळत नाही.
अशा मुलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शाळा पालक आणि शिक्षक यांना मार्गदर्शन करते, शिबिरे राबवते. शिक्षकांना मुलांना शिकवण्यास मदत करणे, दिव्यांग आणि विशेष मुलांना त्यांच्या विकलांगतेचे प्रमाणपत्र मिळवून देणे अशी कामे करावी लागतात. मात्र ढिसाळ पद्धतीने अभियानाचे कामकाज चालत असल्याने विद्यार्थ्यांना कोणत्याही सेवा - सुविधा उत्तमरीत्या देता येत नसल्याचे वास्तव समोर येत आहे.
तपासणी केंद्राचा अभाव
शाळेतील ज्या मुलांना डोळ्यांचे व्यंग आहे, त्यांची वैद्यकीय चाचणी करणे आवश्यक आहे. पण तालुक्यात असे कोणतेही तपासणी केंद्र नसल्याने त्यांना जिल्ह्याच्या ठिकाणी घेऊन जावे लागत असल्याची खंत वसईच्या समन्वयक पूनम ठाकरे यांनी व्यक्त केली. तसेच संपूर्ण जिल्ह्यात एकच केंद्र असल्याने वारानुसार मुलांना चाचणीसाठी घेऊन जावे लागते. परिणामी, पालक आणि शिक्षकांची तारांबळ उडते.