वाडा : वाडा पंचायत समितीच्या उपसभापतीपदी भाजपच्या माधुरी पाटील यांची निवड करण्यात आली. या पंचायत समितीची सदस्य संख्या १२ असून त्यापैकी सत्ताधारी भाजपाचे सहा, राष्ट्रवादी काँग्रेसचा एक तर शिवसेनेचे पाच सदस्य आहेत. भाजपाने शिवसेनेला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसशी समझोता केला आहे. प्रत्येक सदस्याला संधी मिळावी या समझोत्याप्रमाणे माजी उपसभापती नंदकुमार पाटील यांचा कार्यकाळ संपल्याने त्यांनी राजीनामा दिला होता. त्यामुळे आजची ही वाडा पंचायत समितीच्या सभागृहात निवडणूक घेण्यात आली. त्यात भाजपा व राष्ट्रवादी काँग्रेस कडून माधुरी पाटील यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाला होता. विरोधी पक्षाकडून कुणाचाही अर्ज प्राप्त न झाल्याने पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या विशेष सभेचे अध्यक्ष तथा पीठासीन अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी मोहन नळंदकर यांनी काम पाहिले. माधुरी पाटील यांचे भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य बाबाजी काठोले, माजी उपसभापती नंदकुमार पाटील, भाजपचे वाडा तालुका अध्यक्ष संदीप पवार, माजी सभापती अरूण गौंड, जि.प. सदस्य धनश्री चौधरी, सदस्य जगन्नाथ पाटील, मेघना पाटील, ज्येष्ठ कार्यकर्ते भगवान चौधरी, मंगेश पाटील आदींनी अभिनंदन केले आहे. (वार्ताहर)
माधुरी पाटील वाडा पं.स.च्या उपसभापती
By admin | Published: December 27, 2016 2:28 AM