बोईसर : बोईसर विधानसभा मतदारसंघासह संपूर्ण पालघर जिल्ह्याच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध राहू, असे आश्वासन बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांनी दिले. बोईसर विधानसभा मतदार संघातील बहुजन विकास आघाडीचे उमेदवार राजेश पाटील यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी उपस्थित सर्व मित्र पक्ष आणि बविआचे पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांशी संवाद साधताना आपला उमेदवार निवडून येण्यासाठी आतापर्यंत मेहनत घेत आलात, तशीच मेहनत घेण्यास सांगितले.
निष्ठावंत शिवसैनिकांना डावलून शिवसेनेने वसई, नालासोपारा, बोईसर तसेच पालघर या चारही मतदार संघात उभे केलेले उमेदवार हे आयात केलेले आहेत. सेनेकडे उमेदवार नाहीत, असा टोला ठाकूर यांनी लगावून एकही शिवसैनिक असा कार्यक्षम नव्हता का, की ज्याला चारपैकी एका ठिकाणी तरी उभे करू शकले असते, असा प्रतिप्रश्नही त्यांनी केला. आम्ही सलग दोन वेळा निवडून दिलेले आमदार आपल्या मतदार संघात काही काम करतील असे वाटले होते, परंतु दुर्दैवाने तसे काही झाले नाही. यात कुठेतरी माझा पण दोष आहे. तो मी जाहीररित्या मान्य करून आपली माफी मागतो, असेही ते म्हणाले. परंतु यापुढे अजिबात दुर्लक्ष होणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली.
शहरातील वाहतूक कोंडी, पाणी समस्या सोडवण्याचे त्याचप्रमाणे बोईसर विधानसभा मतदार क्षेत्रातील विविध भागातील आदिवासी, शेतकरी, शेतमजूर, कामगार, कष्टकरी, मच्छीमार, छोटे मोठे व्यावसायिक यांच्याही समस्या सोडवण्यास प्राधान्य देण्याचे आश्वासन दिले. यावेळी व्यासपीठावर उमेदवार राजेश पाटील यांच्यासह मित्र पक्ष आणि बविआचे वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते.
मतदारसंघाचा कायापालट करणार
या निवडणुकीत बाहेरची मंडळी येण्यासाठी उत्सुक होती परंतु, मी आमच्या पक्षातील चार इच्छुक उमेदवार एकत्र बसवले आणि त्यांनीच उमेदवार निवडला. राजेश पाटील हे मेहनती असून त्यांना राजकीय, सामाजिक आणि आर्थिक क्षेत्रातही प्रदीर्घ अनुभव आहे. ते बोईसर विधानसभा क्षेत्राचा नक्की कायापालट करतील, असा विश्वास ठाकूर यांनी व्यक्त केला. यासाठी आमच्यासह सगळे कार्यकर्ते त्यांच्या पाठिशी असल्याचेही ते म्हणाले.