पालघर - राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे निरव मोदी, विजय माल्या यांचे राजकीय रूप आहे. निरव मोदी, विजय माल्या या मंडळीनी ज्याप्रमाणे आमिषे दाखवून बँकांचे पैसे लुबाडून पोबारा केला. त्याचप्रमाणे मुख्यमंत्री निवडणूक आली की आश्वासनांची खैरात करून सर्वसामान्यांची मते लुबाडून त्यांची फसवणूक करून पोबारा करतात, अशी घणाघाती टीका काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.
राज्याच्या मुख्यमंत्र्यांवर सडकून टीका करताना सावंत म्हणाले की, राज्याचे मुख्यमंत्री हे निरव मोदी, विजय माल्या यांचे राजकीय रूप आहे. निरव मोदी, विजय माल्या या मंडळीनी ज्याप्रमाणे आमिषे दाखवून बँकांचे पैसे लुबाडून पोबारा केला. त्याचप्रमाणे मुख्यमंत्री निवडणूक आली की आश्वासनांची खैरात करून सर्वसामान्यांची मते लुबाडून त्यांची फसवणूक करून पोबारा करतात. मुख्यमंत्री कल्याण डोंबिवली, भिवंडी, पेण या ठिकाणी वाँटेड आहेत. कल्याण डोंबिवलीकर आमचे साडे सहा हजार कोटी कुठे गेले? आणि पेणवासिय पेण अर्बन बँकेकडे तारण असलेल्या जमिनी सिडको कधी विकत घेणार? याकरिता मुख्यमंत्र्यांचा शोध घेत आहेत असे म्हणत सावंत यांनी पालघरवासियांना पुढील धोक्याचा इशारा दिला.
''गेली चार वर्ष विकासाची कोणतीही कामे केली नाहीत त्यामुळेच मृत व्यक्तींचा वापर करण्याची वेळ भाजप आणि शिवसेनेवर आली आहे. एके ठिकाणी पालघर जिल्ह्याचा विकास हा सत्ताधा-यांमुळे आयसीयूमध्ये मरणासन्न अवस्थेत पडलेला आहे आणि दुसरीकडे भाजप शिवसेना हे दोन्ही पक्ष ऊर बडवून मतांचा जोगवा मागत आहेत,'' असे सचिन सावंत म्हणाले.
पालघर जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे आयोजित पत्रकारपरिषदेला संबोधित करताना सावंत म्हणाले की, पालघर जिल्ह्याचा विकास आयसीयुमध्ये मरणासन्न अवस्थेत आहे. या विकासाला मारण्याचे सत्ताधारी भाजप शिवसेना आणि दोन्ही पक्षांना समर्थन देणा-या बहुजन विकास आघाडीने केले आहे. ख-या अर्थाने शोकच करायचा असेल तर भ्रष्टाचाराने पिचलेल्या, प्रवासात आणि कुपोषणामुळे मरण पावलेल्या लोक आणि बालकांच्या मृत्यूचा शोक सत्ताधा-यांनी केला पाहिजे.
पालघर जिल्ह्यातील आदिवासी व शेतकरी बांधवांच्या जमिनी वाढवण बंदर, मुंबई-वडोदरा हायवे तसेच बुलेट ट्रेन व सिडकोच्या माध्यमातून शासन जबरदस्तीने बळकावत आहेत. केवळ गुजरातच्या विकासासाठी एके ठिकाणी बुलेट ट्रेन सारखे प्रकल्प राबवले जात असताना दुसरीकडे सिडकोच्या माध्यमातून बिल्डरांना शेतक-यांच्या जमिनी आंदण देऊन त्यातून कर्जबाजारी शासन आपले कर्ज फेडणार आहे असा आरोप सावंत यांनी केला.
भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांची राज्यभर एकात्मिक फसवणूक योजना सुरु आहे. समृध्दी महामार्ग व नाणार या दोन्ही ठिकाणी शेतक-यांना फसवल्यानंतर आता यांचा डोळा पालघर वासियांच्या जमिनीवर आहे. शिक्षण, पाणी, आरोग्य, बेरोजगारी, शेतकरी व आदिवासींच्या समस्या सोडवता येत नाहीत म्हणून मुख्यमंत्री आणि भाजपा दुःखाचा बाजार मांडत असताना शिवसेना वेदनांचा उत्सव साजरा करून मते मिळविण्याचा प्रयत्न करित आहे असा टोला सावंत यांनी लगावला. सदर निवडणूक ही साधू विरूध्द संधिसाधू, निष्ठावंत विरूध्द गद्दार, निती विरूध्द अनिती आणि सत्य विरूध्द असत्य अशी आहे. देशपातळीवर नरेंद्र मोदी व देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या सत्ताधा-यांकडून खोटेपणाचा कहर झालेला असताना पालघरवासिय भाजप, शिवसेना व बहुजन विकास आघाडी या तिन्ही सत्ताधा-यांचा आणि दलबदलूंचा वचपा काढल्याशिवाय राहणार नाही आणि निष्कलंक अनुभवी निष्ठावंत व जनसेवेचे व्रत घेतलेल्या दामू शिंगडा यांना विजयी करतील असा विश्वास सावंत यांनी व्यक्त केला आणि स्वतःच्या पक्षाशी गद्दारी करणारे जनतेशी गद्दारी करण्यास मागेपुढे पाहणार नाहीत असा टोला लगावला.
सदर पत्रकारपरिषदेला संबोधित करताना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या अनुसुचित जाती विभागाचे अध्यक्ष डॉ. राजू वाघमारे म्हणाले की, आदिवासींच्या विकास योजनेसाठींचा दीड हजार कोटींचा निधी सरकारने शेतकरी कर्जमाफीकरिता वळवला. निधीअधावी आदिवासींची मुले भुकेने तडपडून मरत आहेत. तसेच दलितांच्या विकास योजनांचा निधीही सरकारने शेतकरी कर्जमाफीसाठी वळवला, मात्र ना शेतक-यांना कर्जमाफी मिळाली ना दलित आदिवासींच्या विकासाच्या योजनांना पैसा राहिला. कुपोषणामुळे गेलेले बळी ही सरकारी हत्या असून याला जबाबदार राज्याच्या मुख्यमंत्र्यांवर ३०२ चा गुन्हा दाखल करावा अशी मागणी डॉ. राजू वाघमारे यांनी केली.
या पत्रकारपरिषदेला पालघर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष केदार काळे व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस विनायकराव देशमुख उपस्थित होते.