पालघर - 'रेतीवाला नवरा पाहिजे', या लोकप्रिय कोळी गीताच्या अल्बम आणि गाण्याने अवघ्या महाराष्ट्राला वेड लावले. या गाण्यातील कलाकारांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. या अफाट लोकप्रियतेमुळे घराघरात पोहचलेल्या पालघर तालुक्यातील सातपाटी गावाचे सुपुत्र धर्मेंद्र तरे यांचे अल्पशा आजाराने, 57 व्या वर्षी मंगळवारी दि.24 जुलै रोजी निधन झाले. ही बातमी समजल्यावर त्यांच्या चाहत्यां मध्ये दुःखाची लाट पसरली असून, त्यांच्या अशा जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
पालघरच्या सातपाटी येथील रहिवासी असलेल्या धर्मेंद्र च्या घरचा मूळ व्यवसाय मासेमारी.मात्र शाळेत आणि घरात ही त्याला संगीता व्यतिरिक्त काही दुसरे सुचायचे नाही.ही संगीतातील भूक शमविण्याच्या प्रयत्नात त्याने प्रथम आपला सहकारी विदेश म्हात्रे ह्यांला सोबत घेऊन "नवरा निघाला सातपाटीचा,त्यानंतर गोरी गोरी पान सातपाटीची शान ह्या दोन कॅसेट काढल्या. त्या बऱ्यापैकी चालल्या असल्यातरी त्याचे समाधान झाले नाही. वेसावे गावातुन अनेक कोळी गाणी गाजत असल्याने आपल्या गावाचे नाव ही गाजायला पाहिजे म्हणून तो नेहमीच अस्वस्थ रहात असे. मध्यंतरीच्या काळात डान्स क्लास,सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन, गणपती,नवरात्रोत्सवात चलचित्र डेकोरेशन ह्या व्यवसायात तो व्यग्र असताना त्याने लिहिलेले आणि संगीत दिलेले "रेतीवाला नवरा पाहिजे" हे गाणे जवळपास सर्वच लग्नमंडपात वाजू लागले.आणि सातपाटीचा हा गीतकार प्रसिद्ध झाला. सुप्रसिद्ध नट विक्रम गोखले ह्यांच्या भूमिकेतून त्याला नित्यानंद बाबा च्या जीवनावर सिनेमा काढायचे त्याचे स्वप्न त्याच्या अकाली मृत्यूमुळे अपूर्ण राहिले. कट्टर शिवसैनिक म्हणून जिल्ह्यात परिचित असलेल्या धर्मेंद्र यांनी निवडणुकीत पक्षाच्या प्रचारासाठी गाणीही लिहिली होती.त्याच्या मृत्यूने तो शरीराने ह्या जगातून निघून गेला असला तरी रेतीवाला नवरा पाहिजे ह्या गाण्या द्वारे तो लोकांच्या मनात घर करून राहिल्याचे त्याचे शिक्षक टी एम नाईक सरांनी लोकमत ला सांगितले.