शशिकांत ठाकूर कासा : डहाणू तालुक्यातील घोळ चिकणपाडा व सारणी कांढोलपाडा येथे आजही वीज नाही. त्यामुळे येथील नागरिकांना प्रकाशासाठी मिनमिणत्या चिमणीचा आधार घ्यावा लागत आहे.सरकारकडून देशातील सर्व खेड्यापाड्यात वीज पोहचली असल्याचा दावा करत असले तरी डहाणू तालुक्यातील अजून गाव पाडे विजेविना आहेत. त्यामुळे सरकारचा दावा पुर्णपणे फोल ठरतो आहे. तालुक्यातील कासा ग्रामपंचायत हद्दीतील घोळ चिकण पाडा व सारणी ग्रामपंचायत हद्दीतील कांढोल पाडा हे मुंबई अहमदाबाद महामार्गापासून अवघ्या २ की मी अंतरावर आहेत. चिकणपाडा येथे सुमारे शंभर कुटुंबे तर कांढोलपाडा येथे ५० आदिवासी कुटुंबे पिढ्यानिपढ्या राहत आहेत. मात्र, या कुटुंबाने अद्याप विजेचा प्रकाश पाहायला न मिळाल्याचे भयाण वास्तव आहे. पाच वर्षांपूर्वी घोळ चिकणपाडा येथे वीज जोडणीचे काम सुरू करण्यात आले त्यासाठी विजेचे खांब उभारण्यात आले मात्र, ही कामे अर्धवट करुन महावितरणचे कर्मचारी गायब झाल्याचे रखमा खरपडे सांगतात. उभारलेल्या या खांबावर वीजेच्या ताराच नाहीत. तर सारणी कांढोलपाडा येथे वारंवार महावितरण कडे मागणी करूनही जोडणी मिळालेली नाही.रेशन दुकानातून दोन ते तीन लिटर मिळणाऱ्या रॉकेलवर त्यांना महिना काढावा लागतो. या चिमणीच्या अंधुक प्रकाशतच येथील आदिवासी कुटूंबांना आपली सर्व कामे पार पाडावी लागतात. तर शाळकरी विद्यार्थी चिमणीच्या प्रकाशतच अभ्यास करतात. जिथे विजेचा पत्ताच नाही तेथे पंखा, टीव्ही, इस्त्री, मोबाइल आदी प्रमुख गरजा बनलेल्या वस्तूंच्या वापराची कल्पना ही कुटुंबे करू शकत नाहीत.
सरकारचा डिजिटल इंडियाचा दावा येथे पडला खोटा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2018 11:53 PM