वाडा : संत निवृत्तीनाथांची यात्रा सोहळा येत्या २१ जानेवारीला त्र्यंबकेश्वर येथे आहे. यानिमित्ताने तालुक्यातील विविध परिसरातून पायी दिंड्या त्र्यंबकेश्वरच्या (नाशिक) दिशेने निवृत्तीनाथ, ज्ञानोबा, तुकोबांचा गजर करत रवाना झाल्या आहेत. तालुक्यातून ठिकठिकाणावरून निघालेल्या दिंड्यांतील वारकऱ्यांना निरोप देऊन स्वागत करण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.
वाडा तालुक्यातील दिनकरपाडा (कोंढले विभाग) पळसपाडा, मेट, देवघर, गुंज, खानिवली, नांदनी, अबिटघर, तिळसा, झिडके, खरिवली, लोहपे, अंभरभुई यांच्यासह पंधराहून अधिक गावांतून या दिंड्या त्र्यंबकेश्वरकडे निघाल्या आहेत. तालुक्यातील वातावरण भक्तीमय झाले असून सर्वच रस्ते दिंड्यांनी फुलून गेले आहेत.
कोंढले विभागातील दिंडीमध्ये चारशेपेक्षा अधिक वारकरी सहभागी झाले असून तरुणांचा सहभाग मोठा दिसत आहे. वाडा तालुक्यातून चार हजारांच्या आसपास वारकरी निवृत्तीनाथ महाराज यांच्या यात्रेला त्र्यंबकेश्वरच्या दिशेने रवाना झाले आहेत. सकाळी काकड आरतीपासून रात्री मुक्कामी कीर्तन, प्रवचन, जागर करत दिवस-रात्र नामस्मरण करून या दिंड्या मंगळवारी (ता.२१) पर्यंत त्र्यंबकेश्वर येथे दाखल होतील. या वर्षी तरुण-तरुणींचा दिंड्यांमध्ये वाढता सहभाग हा भारतीय संस्कृती जोपासण्याचा चांगला संकेत आहे. तरुणवर्ग भक्तीमार्गाला लागल्यामुळे त्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडून व्यसनापासून परावृत्त होतील. आपल्या भारतीय हिंदू संस्कृतीचे जतन व रक्षण करणे ही आज तरुणांची जबाबदारी असल्याचे दिंडी चालक बळीराम भेरे, बबन चौधरी, विलास भेरे, भास्कर दुबेले, प्रभाकर पाटील, माधव चौधरी, सीताराम चौधरी, मंगेश विशे यांनी सांगितले.