- राहुल वाडेकरलोकमत न्यूज नेटवर्कविक्रमगड : बदलत्या हवामानाचा फटका बसूनही हिरव्यागार आंबट कैऱ्या विक्रमगड, जव्हार तसेच मोखाड्यातील बाजारांत दाखल झाल्या आहेत. मात्र, निसर्गाने दिलेल्या ‘दाना’ला कोरोनाचे ग्रहण लागल्याने संचारबंदीमुळे बाजारात ग्राहकच येत नसल्याने रानमेवा विक्रीसाठी घेऊन आलेल्या आदिवासींमध्ये निराशा पसरली आहे.
आंबा तसेच काजूगर या पिकांवर हवामानाचा मोठा परिणाम होत असल्याने गेल्या दोन-चार वर्षांत आंबा पूर्वीप्रमाणे मोठ्या प्रमाणात बाजारात येणे कठीण झाले आहे. त्यामुळे बाजारपेठेत १०० रुपये किलो दराने मोठी कैरी तर छोटी कैरी साठ रुपये दराने विकण्यात येत आहे, तर काही दिवसांपासून ओले काजूगरही बाजारात दिसू लागले आहेत. त्यामुळे आदिवासींना थोड्याफार प्रमाणात का होईना रोजगार उपलब्ध होऊन अर्थार्जनाचा लाभ होत आहे. परंतु, संचारबंदीमुळे त्यांचाही हिरमोड होत आहे.
विक्रमगड, जव्हार, मोखाडा हे तीन तालुके आदिवासीबहुल असल्याने येथे फक्त शेती हेच उपजीविकेचे साधन आहे. एमआयडीसी नसल्याने कारखानदारी व मोठा उद्योगधंदा वा रोजगार देणारे कोणतेही साधन उपलब्ध नसल्याने येथीन आदिवासींना निसर्गावरच अवलंबून राहावे लागते. त्याप्रमाणे जंगल संपत्तीवर आपली उपजीविका करत कुंटुंबाची गुजराण करावी लागते. त्यामुळे उन्हाळ्यात आंबा, काजू, करवंद, जांभळे, फणस तर पावसाळ्यात कर्टुली, रानभाजी, शेवळे यांची बाजारात विक्री करून उदरनिर्वाह करावा लागतो. मात्र, सध्या कोरोनामुळे त्यांच्यावर मोठे संकट ओढवले आहे. बाजारात आंब्यांच्या कैऱ्यांना बाहेरील चाकरमान्यांकडून जास्त प्रमाणात मागणी असते. शिवाय स्थानिक नागरिकही खरेदी करण्यासाठी गर्दी करतात. आंबा कैरीचे लोणचे तयार करण्यासाठी अनेक गृहिणी कैऱ्या खरेदी करतात, मात्र यंदा पुन्हा कोरोनाने आदिवासींना निराश केले आहे.
नैसर्गिक पिकांवर उपजीविकाnजव्हार, मोखाडा, विक्रमगड तालुक्यातील प्रत्येक आदिवासींच्या घरासमोर दोन-चार आंब्यांची व काजूची झाडे हमखास असतातच, तर या फळांच्या बागाही या तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात आहेत. nजव्हारच्या धाब्यांवर स्पेशल थाळीत काजूगरांची भाजी ऑर्डरनुसार तयार करून दिली जाते. या नैसर्गिक पिकांवर आदिवासी मात्र आपली उपजीविका करत रोजगार मिळवत आहेत. nभेळ विक्रेतेही कैरीची खरेदी करतात. कैरीबरोबर ओले काजूगर बाजारात येत आहेत. २५० ते ३०० रुपये किलो दराने काजूगरांची विक्री होत आहे.