डहाणू : डहाणू येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या शिफारसीनुसार डहाणू बोर्डी सागरी मार्गाच्या दुतर्फा वृक्षांची मोजणी नुकतीच बोर्डी वन विभागाने केली आहे. त्यातून परिसरामध्ये अडिच हजारांपेक्षा जास्त झाडे असल्याची नोंद करण्यात आली असली तरी या भागात आगामी काळामध्ये रस्ता रुदींकरण व मेट्रो जाळे निर्माण करण्याच्या द्रृष्टीने चाचपणी किंवा होमवर्क तर नाही ना अशी चर्चा गावकऱ्यांमध्ये सुुरु आहे.मुंबई वेगवान बनविण्यासाठी मेट्रोचे जाळे निर्माण केले जाणार आहे. या करिता मंत्रालय परिसरातील सुमारे अडीचहजाराहून अधिक झाडांचे अन्य ठिकाणी स्थलांतर करून पुन:रोपण केले जाणार आहे. दरम्यान, ही घटना ताजी असतानाच तालुक्यातील डहाणू बोर्डी प्रमुख सागरी मार्गाच्या दुतर्फा असलेले ६१८ वृक्ष, घोलवड मुसळपाडा मार्ग १४२५ , खेडपाडा ते खुनवडा (रामपूर मार्ग) ४१५ आणि अस्वाली ते बोर्डी २४६ अशा एकूण २७०४ झाडांची मोजणी करून त्यांना क्रमांक देऊन त्यांची नोंदणी करण्यात आली आहे. यामध्ये विविध जाती तसेच आकारमानाने लहान-मोठया वृक्षांचा समावेश आहे. पीडब्ल्यूडीने डहाणू उपवन कार्यालयास शिफारस केल्या नुसार बोर्डी वन परीक्षेत्राचे वनक्षेत्रपाल डी. सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल आणि वनरक्षकांनी झाडांची मोजणी केले. तर दुसऱ्या बाजूने सा. बांधकाम विभागाकडून अशा झाडांना रंगरंगोटी करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान, आगामी काळात या भागात रस्त्यांचे जाळे निर्माण होणार का? याकडे गावकऱ्यांचे लक्ष लागले आहे. (वार्ताहर)डहाणू उपवन संरक्षकांच्या शिफारसीनुसार संबंधित रस्त्याच्या दुतर्फा वृक्षांची मोजणी करण्यात आली आहे.-डी. सोनावणे, वनक्षेत्रपाल, बोर्डी वनपरिक्षेत्र
वृक्ष मोजणीमुळे चर्चा अन् शंकाना उधाण!
By admin | Published: December 25, 2016 12:12 AM