मुंबई - टेस्टट्यूब प्रक्रियेद्वारे अविवाहित मातेच्या पोटी जन्मलेल्या मुलीच्या जन्मदाखल्यावरून वडिलांचे नाव हटविण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला बुधवारी दिले. महापालिकेने यापूर्वी ज्या संस्थांना मुलीचा जन्मदाखला दिला, तो मागे घेऊन वडिलांचे नाव हटवून नव्याने जन्मदाखला देण्याचा आदेश न्या. अभय ओक व न्या. रियाझ छागला यांच्या खंडपीठाने महापालिकेला दिला.टेस्टट्यूब प्रक्रियेद्वारे मुलीला जन्म देणाऱ्या नालासोपाराच्या एका महिलेने मुलीच्या जन्मदाखल्यावरून वडिलांचे नाव हटविण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. वीर्यदान करणा-याचेच नाव वडील म्हणून अर्जात भरल्याने महापालिकेने जन्मदाखल्यावर दात्याचेच नाव वडील म्हणून टाकले. मात्र, वीर्यदान करणा-चे नाव उघड करायचे नसल्याने त्याचे नाव हटविण्याचे निर्देश महापालिकेला द्यावे, अशी विनंती संबंधित महिलेने न्यायालयाला केली. त्यासाठी तिने २०१५मध्ये सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचा हवाला दिला. या आदेशानुसार, अविवाहित किंवा एकट्या मातेने मुलाच्या जन्मदाखल्यावरून त्याच्या वडिलांचे नाव हटविण्याची विनंती केली, तर संबंधित प्रशासनाने त्याची दखल घेऊन मुलाच्या जन्मदाखल्यावरून त्याच्या वडिलांचे नाव हटवावे.गेल्या आठवड्यात महापालिकेने मुलीचा जन्मदाखला व मूळ कागदपत्रे न्यायालयात सादर केली. मूळ कागदपत्रांनुसार, मुलीच्या जन्मावेळी याचिकाकर्तीने अर्जात तिचे पूर्ण नाव नमूद केले होते, अशी माहिती महापालिकेने न्यायालयाला दिली.नाव खोडण्याचे अधिकार पालिकेला नाहीया अर्जावर याचिकाकर्तीने शंका उपस्थित केल्यावर महापालिकेने त्यावर याचिकाकर्तीची सही असल्याचेही न्यायालयाच्या निदर्शनास आणले. जन्मदाखल्यावरून मुलीच्या वडिलांचे नाव हटविण्याची याचिकाकर्तीची विनंती नाकारत, महापालिकेने एखाद्याच्या मृत्यू व जन्माची नोंद केल्यानंतर ती खोडण्याचे अधिकार आपल्याला नसल्याचे न्यायालयाला सांगितले.
जन्मदाखल्यावरून वडिलांचे नाव हटवा, टेस्टट्यूब बेबी प्रकरणी उच्च न्यायालयाचे मुंबई महापालिकेला निर्देश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 05, 2018 5:44 AM