विरार : वसई रोड पश्चिमेत असलेल्या एकमेव शवविच्छेदन केंद्राची अक्षरश: दुरवस्था झाली आहे. या केंद्रातील भिंती, पत्र्यांची बिकट अवस्था आहे. तसेच लाईट गेल्यास जनरेटरअभावी मृतदेहाची फरफट होत आहे. डॉक्टरांना सुद्धा जीव मुठीत धरून काम करावे लागत आहे.
पालघर जिल्हा परिषदेच्या नवघर प्राथमिक आरोग्य केंद्रात एकमेव शासकीय शवविच्छेदन केंद्र आहे. या केंद्रात ज्या ठिकाणी डॉक्टर बसतात तेथे लाईट गेल्यास जनरेटरची सोयही उपलब्ध नाहीे. भिंतीवरील वायर्सही लोंबकळलेल्या अवस्थेत आहेत. यामुळे कर्मचाऱ्यांना शॉक लागण्याची भीती आहे. तसेच इमारतीच्या छपरावरील पत्रे शवविच्छेदन भागात व अन्य ठिकाणीही तुटलेले आहेत. इमारतीचे खांबसुद्धा तुटलेले असून ते कोणत्याही क्षणी कोसळून दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. केंद्राच्या परिसरातील झाडांच्या फांद्या पत्र्यावर पडून पत्रे तुटले आहेत.
अशा प्रकारे हे शवविच्छेदन केंद्र शेवटची घटका मोजत असून येथे कार्यरत असलेले डॉक्टर, कर्मचारी जीवावर उदार होऊन काम करीत आहेत. हे केंद्र जिल्हा परिषदेकडून नगरपरिषदेकडे हस्तांतरित करावे म्हणून नवघर-माणिकपूर नगरपरिषदेने तसेच आमदार हितेंद्र ठाकूर यांनी पाठपुरावा करूनही ही मागणी तांत्रिकतेच्या लालफितीत अडकून पडली आहे.जनरेटरचा अभाव
शवविच्छेदन केंद्रात लाईट गेल्यावर जनरेटरची सोय नाही. त्यामुळे समस्यांना सामोरे जावे लागत आहे. लाईट नसल्याने मृतदेह शीतगृहात ठेवण्यासाठी विरार येथे न्यावे लागतात. त्यामुळे अनेकदा मृतांच्या नातेवाईक व डॉक्टरांमध्ये बाचाबाचीचेही प्रकार घडतात.वघरच्या या शवविच्छेदन केंद्रात वसई ब्लॉक काँग्रेस महिला अध्यक्षा रोहिणी कोचरेकर काही कामानिमित्त आल्या होत्या. या वेळी त्यांना शवविच्छेदन केंद्राची अवस्था गंभीर वाटली.त्यामुळे त्यांनी शवविच्छेदन केंद्राची युद्ध पातळीवर दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी पालघर जिल्हा परिषदेकडे केली आहे. वेळीच कार्यवाही न केल्यास या शवविच्छेदन केंद्रासमोर आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.